टिफीनमध्ये घेतलेली चपाती फ्रेश रहावी यासाठी ती ‘कॉईल पेपरमध्ये गुंडाळून ठेवली जाते. पण दिल्लीतले चोर मोबाईल चोरल्यानंतर त्याचे लोकेशन, नेटवर्क मिळण्यास अडथळा यावा याकरिता कॉईल पेपरचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. भाविकांच्या खिशातील मोबाईल लांबविल्यानंतर चोरांनी ते ‘कॉईल पेपर’मध्ये गुंडाळून ठेवले होते. काळाचौकी पोलिसांच्या हाती लागलेल्या दिल्लीतल्या चोरांची ही नामी शक्कल उघडकीस आली आहे.
लालबाग-परळमध्ये गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीत हात साफ करण्यासाठी चोरटे येणार हा पूर्वेतिहास लक्षात घेता पोलिसांनी त्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता. साध्या वेशातील पोलिसांनी सर्वत्र करडी नजर ठेवली होती. म्हणून नऊ मोबाईल चोर काळाचौकी पोलिसांच्या हाती लागले. त्या चोरांमध्ये काही दिल्ली, यूपी तर काही महाराष्ट्रातील निघाले. त्या चोरांकडे चोरलेले मोबाईलदेखील मिळाले. पण दिल्लीतल्या चोरांनी मोबाईल लपविण्यासाठी वापरलेली ‘ट्रिक’ पाहून पोलीसही चक्रावले. मोबाईल चोरल्यानंतर त्याचे लोकेशन अथवा नेटवर्क मिळू नये यासाठी ते कॉईल पेपरमध्ये गुंडाळून ठेवले होते. यामुळे महागडे फोन सहजरीत्या मुंबईबाहेर घेऊन जाता येतील असा दिल्लीतल्या चोरांचा मनसुबा होता, परंतु मुंबई पोलिसांमुळे तो उधळला गेला.