अदानी हुशार निघाला, इकडे आपण अडाणी निघालो! राज ठाकरेंचा हल्लाबोल

अदानी हुशार निघाला, इकडे आपण अडाणी निघालो, असं म्हणता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई अदानींच्या घशात घालण्याच्या सरकारच्या डावावर टीका केली आहे. राज ठाकरे यांची दादरच्या शिवतीर्थावर आज गुढीपाडव्याची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणींना सांगणं आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर इतिहास वाचायचा बंद करा. इतिहास तुम्हाला जातीतून कोणी सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी लक्षात ठेवा की, तो कोणत्या ना कोणत्या पक्षाला बांधील असतो. तुमची फक्त माथी भडकवण्यासाठी हे उद्योग केले जातात. तुम्ही महाराष्ट्र, मराठी म्हणून एकत्र येऊ नये, यासाठी हे प्रयत्न सुरु असतात. विषय वेगळे असतात, मात्र असे विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं. आम्ही तिकडे बघतो आणि इकडे बाकीचे काम आटपून घेतात. *मधल्यामध्ये आदींना जमीन सुद्धा मिळून जाते.”

ते म्हणाले, “मुंबईचा विमानतळ दिला अदानींना, नवीन मुंबईचा विमानतळही अदानींना दिला. आता पालघरचाही अदानींना दिला. तिथलं बंदरही त्यांनाच दिलं. अदानी हुशार निघाला, इकडे अडाणी निघालो.”

लाडकी बहीण योजना बंद होणार

महायुती सरकाराच्या लाडकी बहीण योजनेवरही राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “लाडकी बहिणीचं काय झालं, काही नाही. ती योजना बंद होणार.”