MNS Raj Thackeray मनसेने मराठी आंदोलनाचा मुद्दाही गुंडाळला

मनसेने बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे तपासण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशावरून आंदोलन हाती घेतले होते, परंतु मनसेने आश्चर्यकारकरीत्या मराठी आंदोलनाचा मुद्दाही आज गुंडाळला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून तूर्तास आंदोलन थांबवा असे सांगितले.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर हे पत्र पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे यांच्या सूचनेवरूनच मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला होता. त्यावेळी काही ठिकाणी कर्मचाऱयांना मारहाण झाल्याचेही प्रकार घडले. त्यामुळे बँक कर्मचाऱयांमध्येही नाराजी पसरली होती. आता राज ठाकरे यांनीच माघार घेत कार्यकर्त्यांना हे आंदोलन थांबवण्यास सांगितले आहे. मराठीबाबत आता पुरेशी जागृती झाली आहे असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे मिंधे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट झाल्याने मनसेच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. यापूर्वीही मनसेने परप्रांतीयांविरुद्ध आंदोलन छेडले होते, पण काही दिवसांतच ते मागे घेतले गेले. त्यानंतर मराठी पाटय़ांचा मुद्दा हाती घेतला, परंतु तोसुद्धा अधिक काळ चालला नव्हता.