वरळी–शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका,लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची! प्रभादेवीवासीयांचा संताप…

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधलेल्या न्हावा-शेवा उन्नत मार्गासाठीचा शिवडी-वरळी कनेक्टर एल्फिन्स्टन ब्रिजवरून बांधण्यात येत असताना या ठिकाणच्या रहिवाशांना सात दिवसांत घरे-दुकाने रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र आम्ही या ठिकाणी गेल्या 100 वर्षांपासून राहत असताना सात दिवसांत घर कसे रिकामी करणार, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. एमएमआरडीएच्या कनेक्टरसाठी भूमिपुत्रांच्या मुळावर येऊ नका, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून शिवडी- न्हावा-शेवा अटल सेतू बांधण्यात आला आहे. त्याला वरळी ते शिवडी 4.5 किमीच्या कनेक्टरने जोडण्यात येणार आहे. यासाठी 125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन ब्रिजवरही हातोडा पडणार आहे. मात्र या ठिकाणी गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ राहणाऱया घरांपासून अगदी आठ ते दहा फुटांजवळून हा कनेक्टर प्रस्तावित आहे. यामुळे आमचे वैयक्तिक आयुष्य आणि आरोग्य संपणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षे आम्हाला पुनर्वसनाचे गाजर दाखवून आता थेट कनेक्टरच्या नावाखाली घरे रिकामी करण्याची बजावलेली नोटीस अन्यायकारक आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांच्या वतीने एल्फिन्स्टन ब्रिजजवळ भलेमोठे होर्डिंग लावून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याची दखल सरकार घेते का, याकडे आता रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

– वरळी-शिवडी कनेक्टरमुळे एल्फिन्स्टन ब्रिजजवळील तब्बल 400 कुटुंबे बाधित होणार आहेत. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

– ज्या इमारती म्हाडा स्वतः दुरुस्त करीत होती त्या आता अचानक धोकादायक यादीत टाकून सात दिवसांत रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. 1974 पासून या जागेवर सुधारित रस्ता सीमांकन न्हावा-शेवा पुलासाठी टाकण्यात आल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
– पालिकेने नेमलेल्या सर्वेक्षण समितीने हा पूल सुधारित रस्ता सीमांकनानुसार घरे रिकामी केल्याशिवाय बांधू नये, असे स्पष्ट नमूद केले आहे.