काही स्वयंघोषित इच्छुक अधिकृत घोषणा झालेली नसतानाही स्वतःहून प्रचार करू लागले आहेत. बंडखोरी करणाऱ्यांना आम्ही कोणताही पाठिंबा दिलेला नाही. महाविकास आघाडी उरण विधानसभा मतदारसंघात जो उमेदवार देईल, त्याचेच काम कार्यकर्त्यांनी करावे व त्याच उमेदवाराला शेकापचे मतदान करा, असे आवाहन माजी आमदार विवेक पाटील केले आहे.
शेकापचे नेते विवेक पाटील यांनी संदेश पाठवला असून त्यात पक्षाची भूमिका मांडली आहे. त्याची माहिती देताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सभापती राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, शेकापने कोणत्याही मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. तरीही काही जण स्वतःच उमेदवार असल्याचे सांगत प्रचार करीत सुटले आहेत. मात्र त्यांना शेकापचा कदापि पाठिंबा मिळणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत प्रतारणा नाही
शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून कोणत्याही परिस्थितीत प्रतारणा केली जाणार नाही. आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचेच काम शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने करावे, अशी भूमिका विवेक पाटील यांनी घेतली असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली.