दिल्लीत 25 जानेवारीपासून ईव्हीएमविरोधात एल्गार, आमदार उत्तम जानकर यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर ईव्हीएमविरोधात दिल्लीत एल्गार पुकारणार आहेत. 25 जानेवारीपासून म्हणजेच निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनीच जंतरमंतरवर सरकारविरोधात निषेध आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. जानकर यांनी आज शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ईव्हीएमविरोधात मारकडवाडीसह इतर गावांमध्ये उठाव झाला. संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारचे वातावरण असून या ईव्हीएम घोटाळय़ाचे मूळ कुठे आहे याचा कुठे ना कुठेतरी शोध घेतला पाहिजे. दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांना पकडायचे. चोर हा कुठे ना कुठेतरी पकडला जातोच. त्याला रंगेहाथ पकडण्यासाठीच आम्ही आलो आहोत. संजय राऊत आमचे नेते आहेत. बऱयाच काळापासून ते लढाया करताहेत. जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ते न डगमगता ज्या हिमतीने लढले त्याच हिमतीने आम्ही लढतोय, असे जानकर म्हणाले.

महाराष्ट्रातील उद्रेक देशातील जनतेसमोर आणू – संजय राऊत

ईव्हीएमचा घोटाळा करून निवडणुका जिंकणे हा राष्ट्रद्रोह आहे. परंतु हा घोटाळा कशा पद्धतीने झाला, होतोय आणि लोकांचा उद्रेक काय आहे हे उत्तम जानकर यांच्या मारकडवाडी गावाने दाखवले. पुढच्या महिन्यात जे अधिवेशन होईल त्या काळात महाराष्ट्रातील उद्रेक देशातील जनतेसमोर आणू, जंतरमंतरवर तीव्र आंदोलन छेडू, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.