ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार मोहित कंबोज, आमदार उत्तम जानकर यांचा दणका

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन सेटिंग करण्याची जबाबदारी मोहित कंबोजवर दिली होती. ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार कंबोजच आहेत, असा गंभीर आरोप माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्यामुळे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले, असे आरोप सातत्याने होत आहेत. माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी गावात ‘ईव्हीएम’चा पर्दाफाश करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारीही केली होती. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून बॅलेट पेपरवरील मतदानाची प्रक्रिया होऊ दिली नाही. आज आमदार जानकर यांनी एक व्हिडीओ जारी करत आणखी गंभीर आरोप केले. ईव्हीएम घोटाळ्याच्या तळाशी आपण जाणार, सबळ पुरावे शोधणार आणि पूर्ण पर्दाफाश करणार असे जानकर म्हणाले.

सेटिंगची जबाबदारी होती

कोण मोहित कंबोज? हा माणूस राजकीय नाही. कधी आमदार, मंत्री नाही. तरीही निकालाच्या दिवशी 120 जागा निवडून येणार, असं तो ओरडून सांगत होता. यातून काय संदेश देताय महाराष्ट्राला? असा सवाल जानकर यांनी केला. ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग करण्याची जबाबदारी कंबोज यांच्यावर सोपविली होती. ती त्यांनी चोख पार पाडली. हा फक्त एक टक्का पुरावा आहे. 99 टक्के पुरावे बाकी आहेत, असे जानकर यांनी सांगितले.

सरकार 3 महिन्यांत जाणार

घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी 3 ते 4 महिने लागतील. तेव्हा महाराष्ट्र माझ्यासोबत उभा राहील आणि हे सरकार शंभर टक्के जाईल. हे सरकार आभाळातून पडले आहे, असा टोलाही जानकर यांनी हाणला.

कंबोज म्हणाले होते, ‘एकसो बीस बोला था ना!’

विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उचलून आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी ‘क्या बोला था, एकसो बीस…!’ असे कंबोज म्हणाले होते. 120 आमदार निवडून येणार एवढा आत्मविश्वास त्यांना कुठून आला? याच्याशी संबंधित व्हिडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे, अशी माहिती जानकर यांनी दिली.

ईव्हीएम ‘हॅक’ नाही पण ‘मॅनिप्युलेट’ करता येते; आयटी तज्ञांचे मत

ईव्हीएम ‘हॅक’ करता येऊ शकत नाही, पण ‘मॅनिप्युलेट’ करता येऊ शकते. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे मान्य आहे; पण त्याच्याशी छेडछाड किंवा मतांमध्ये फेरफार होऊ शकते हे मानण्यास वाव आहे, असे स्पष्ट मत कम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर तज्ञांनी आज व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘ईव्हीएम लोकशाहीचे संरक्षक की धोका?’ या दी बिग डिबेट चर्चासत्रात कम्प्युटर सायन्स क्षेत्रातील तज्ञ माधव देशपांडे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर तीर्थराज सामंत यांनी ईव्हीएमबाबत स्पष्ट मते व्यक्त केली.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)बद्दल सर्वच शंका व्यक्त करतात, पण त्याच्याशी फेरफार होऊ शकते याविषयी ठोस पुरावा कुठेही उपलब्ध नाही. फेरफार होत असल्याचा दावा करणाऱ्यांनी तो नेमका कोण करतात हे सांगण्याची गरज आहे. तोपर्यंत ईव्हीएमवर शंका व्यक्त करणे गैर आहे, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते

ईव्हीएमची रचना सदोष असल्याची माझी सुरुवातीपासूनची धारणा आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे मान्य आहे; पण त्याच्याशी छेडछाड किंवा मतांमध्ये फेरफार होऊ शकते हे मानण्यास वाव आहे. निवडणुकीमध्ये मतदार देत असलेले मत हा डेटा आहे आणि मतदार हा त्याचा मालक आहे. जर मतदाराच्या मनात त्याने दिलेले मत नेमके कुणाकडे जाते याविषयी जर त्याच्या मनात शंका असेल तर ती माहिती निवडणूक आयोगाने द्यावी, असे माधव देशपांडे म्हणाले. ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट हे सर्वाधिक धोकादायक यंत्र आहे. ते निवडणूक प्रक्रियेत आणल्यापासूनच फेरफार झाल्याच्या तक्रारींना सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयोग म्हणते की, मतदारांनी दिलेल्या मतांच्या कंट्रोल युनिटमध्ये दोन कॉपी तयार होतात. मतमोजणी प्रक्रियेत नेमकी कोणती मते मोजली जातात याविषयी मात्र काहीही स्पष्टता नाही. निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. पारदर्शकता नसणे ही मेख ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करते, असेही माधव देशपांडे म्हणाले. जेव्हा काही लपविण्यासारखे असते तेव्हाच उत्तरे दिली जात नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्याला उत्तर देताना तीर्थराज सामंत म्हणाले की, ईव्हीएमची रचना करताना हजारो तंत्रज्ञ एकत्र येतात. त्याचे प्रोग्रॅमिंग, कोडिंग करण्यात ते सहभागी होतात. एखाद्या उमेदवाराला मते वाढवून द्यायची असे ठरवले तरी त्यासाठी वेगळे कोडिंग बनवावे लागेल. त्यासाठी तंत्रज्ञाला कारण द्यावे लागते. ईव्हीएमध्येच फेरफार होतो असे म्हणणे म्हणजे त्यात हजारो व्यक्तींचा सहभाग आहे, असा दावा करणे आहे. एका राज्यात लाखो ईव्हीएम मशीन असतात, त्यात फेरफार करण्यासाठी फार मोठी फौज लागेल, आणि हे करणे निव्वळ अशक्य आहे.

ईव्हीएममध्ये फेरफार होतो असे म्हणणारे कोणताही सबळ पुरावा देत नाहीत. उलट ते असा फेरफार होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करतात. अशी शक्यता व्यक्त करणारे उद्या मशीनमध्ये बॉम्ब बसविणे शक्य आहे असेही म्हणू शकतात. ईव्हीएम सुरक्षित आहेत असे मानण्यासाठी त्याचे सर्किट आणि कोडिंग सार्वजनिक करा असे म्हणतात; परंतु देशात काही बाबी राष्ट्रीय गुपिते असतात. त्यामुळे अशी मागणी करणे हास्यास्पद आहे, असेही सामंत म्हणाले.

मतदाराला मत जाणून घेण्याचा हक्क – दिग्विजय सिंह

चर्चासत्राला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उपस्थित होते. ते म्हणाले, लोकशाहीत मतदाराला त्याने मत कोणाला दिले हे जाणून घेण्याचा हक्क आहे. मी कुणाला मत दिले, ते कुणाला गेले आणि ते योग्य रीतीने मोजले गेले आहे का हे माहिती करून घेण्याचा हक्क आहे. मतदाराला व्हीव्हीपॅटची पावती मिळावी, जी घेऊन तो बॅलेट बॉक्समध्ये टाकेल. त्यानंतर या पावत्याही मोजल्या तर मतदारांचा मतदानावर विश्वास वाढेल, असे ते म्हणाले.