मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळे पोलीस वाल्मीक कराडच्या आकाच्या गर्दनीपर्यंत पोहोचली होती आणि म्हणून घाबरून तो सरेंडर झाला अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.
धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आका आणि कंपनीने परळीमध्ये अनेक खून पचवले. दहा-पंधरा खून पचले. त्यामुळेच त्यांची हिंमत झाली फरार व्हायला, पण संतोष देशमुख यांचा खून आम्ही पचू देणार नाही, असा इशारा धस यांनी दिला. परळीतील वाळू माफियांचे रॅकेट हेसुद्धा आकांचेच आहे.
आकांचाच भाऊ अजय मुंडे त्यात आहे. आकांचाच दत्ता कराड नावाचा माणूस त्यामध्ये आहे. दाऊदपूर आणि आसपासच्या परिसरातून उचललेल्या राखेचे सर्वेक्षण करून ते सर्व बोझे आकाच्या या गुंडांच्या सातबारावर टाकावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
हा आका कोण, असे विचारले असता धनंजय मुंडे यांचे नाव न घेता धस म्हणाले की, त्या आकाचे नाव चौकशीत समोर येईल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा अजितदादा यांचा प्रश्न असल्याचे धस म्हणाले.