संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी आणि खंडणी प्रकरणातील वाल्मीक कराड तीन आठवडे होऊनही सापडत नाहीत, मात्र तपास योग्य दिशेने चालू आहे. ‘आका’ आणि त्यांचे ‘आका’ यांच्यात शरणागतीवरून द्वंद्व सुरू असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. बीडमधील जंगलराज संपवायचे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जिह्याचे पालकमंत्री व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. बीडमध्ये शस्त्रे परवाने खिरापतीप्रमाणे वाटण्यात आले होते. त्यापैकी 105 परवाने रद्द करण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत उर्वरित परवान्यांवर कारवाई करा, अशी विनंती आपण जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे ते म्हणाले.
प्राजक्ता माळींचा विषय संपला
प्राजक्ता माळी यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार सुरेश धस यांनी हा विषय आपल्यासाठी संपल्याचे स्पष्ट केले. जे झाले त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, मात्र प्रसारमाध्यमांनी संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येवरून लक्ष विचलित करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
पर्यावरणमंत्र्यांनी सरळ दृष्टी तरी फिरवावी
परळीमध्ये रोज शेकडो टिप्पर राखेची अवैध वाहतूक करत आहेत. हे टिप्पर उघडेच असतात. राखेच्या उडणाऱ्या कणांमुळे त्वचेचे आजार पसरत आहेत. लहान मुलांना दमा होत असून, शेकडो एकर जमीन नापीक होत आहे. पर्यावरणमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीकडे थोडीशी वक्रदृष्टी टाकावी, ते नाही जमले तर निदान सरळ दृष्टी तरी फिरवावी, असा टोला धस यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना लगावला.
सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी चिखलीत सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोंच्या जनसागराने संतोष देशमुख यांच्या आरोपीला कठोर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करीत परिसर दणाणून सोडूला.