किळसवाणा प्रकार! पानमसाला खाऊन आमदार विधानसभेच्या हॉलमध्ये थुंकला, अध्यक्षांनी फटकारलं

पानमसाला खाऊन विधानसभेच्या हॉलमध्येच एका आमदाराने पिचकारी मारल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विधानभवन परिसरात गुटख्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेतील हा प्रकार आहे.  त्यानंतर विधानभवन परिसरात गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला.

उत्तर प्रदेश विधानभवन परिसरात पानमसाला, गुटख्यावर बंदी घालण्यात आली आहे. विधानभवन परिसरात आमदार, कर्मचारी, अधिकारी यांच्यासह इतर कोणीही पानमसाला, गुटखा खाल्ल्यास त्याला 1000 रुपयांचा दंडही भरावा लागेल, असे आदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी दिले.

कामकाज सुरू होण्यापूर्वी मंगळवारी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ पानमसाला खाऊन तिथे थुंकल्याचे निदर्शनास आले. या किळसवाण्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून सफाई करण्यात आली. हा गलिच्छ प्रकार करणाऱ्याचा निषेध करण्यात आला. ‘पानमसाला खाऊन थुंकणाऱ्या आमदाराला आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे. पण मी त्या सदस्याचा जाहीरपणे अपमान करणार नाही. म्हणून त्या आमदाराचं नाव घेत नाही. त्यामुळे विधानसभेची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी ही कुठल्या एका व्यक्तीची नाही तर सर्वांची आहे’, असे विधानसभा अध्यक्षांनी घाण करणाऱ्यांना सुनावले.