मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी; चक्क पोलिसाला स्वत:ची गाडी धुवायला लावली

विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत चर्चेत असतात. त्यात आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात गायकवाड यांची गाडी चक्क त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून टीका करण्यात येत आहे.

शहरातील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानंतर गायकवाड यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या असलेल्या पोलिसाला आमदार महाशयांनी चक्क गाडी धुवायला लावल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस यंत्रणा माय-बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाडय़ा धुण्यासाठी, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून, हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडीओत स्पष्ट दिसत नाही. मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱयांपैकीच तो असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येऊन महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाडय़ा धुण्यासाठी, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.