वाल्मीक कराडला मदत करणाऱ्यांनाही आरोपी करा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासातील काही गोष्टी संशयास्पद असल्याचे वक्तव्य बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल पह्न अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. जोपर्यंत सीडीआर तपासला जाणार नाही तोपर्यंत यातील इतर गुन्हेगार व त्यांचा रोल समजू शकणार नाही. तसेच वाल्मीक कराडला मंत्री धनंजय मुंडेंची मदत मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाल्मीक कराड एकटा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयाला थांबवण्याचे काम करू शकत नाही. त्याला धनंजय मुंडे यांनी सहकार्य पेले आहे. पुण्यातील रुग्णालयात वाल्मीक कराड याला कोणी दाखल केले होते, याचा तपास करा. पुण्यातून फरार झाल्यानंतर वाल्मीक कराड कुठे गेला? सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या अनुषंगाने तपास करून ज्यांनी वाल्मीक कराडला मदत केली त्यांना पण या गुह्यात आरोपी केले पाहिजे, देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवले पाहिजे, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.

आता पोलीस अधीक्षकांपुढे उपोषण

आमच्या प्रकरणाची पोलीस अधिक्षकांनी दखल घ्यावी. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडीमार्फत करावा, नाही तर आम्ही कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.