आमदारांचा 50 कोटींचा रेट कसा निघाला…याचे गमक समृद्धी महामार्गातच! राजू शेट्टी यांचा आरोप

कुणाचीही मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती करण्यात येत असून केवळ राजकीय लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकार्‍यांना भ्रष्टाचार करता यावा यासाठीच हा महामार्ग निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. समृध्दी महामार्गामुळे कुणाची समृध्दी झाली आणि आमदारांचा 50 कोटींचा दर कसा निघाला याचे गमकही समृद्धी महामार्गातच दडले असून शक्तीपीठ महामार्गही त्यासाठीच होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी मिंधे सरकारवर केला.

मालेगाव येथे सायंकाळी शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या वतीने मेळावा घेण्यात आला. शक्तीपीठास विरोध करण्यासाठी मालेगाव, अर्धापूर येथील कृती समिती वेगवेगळ्या मंडळींना भेटून हा महामार्ग शेतकर्‍यांच्यासाठी हिताचा नसल्याचे सांगत आहेत. यापूर्वीही या समितीने अनेकांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना मालेगाव येथे बोलवण्यात आले होते. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते.

जनतेकडून किंवा अन्य मंडळीकडून कुठलीही मागणी नसताना शासनाचे निकष डावलून शेतकर्‍यांची जमीन या महामार्गासाठी घेण्याचे कटकारस्थान सुरु असून मिंधे सरकार व अधिकार्‍यांच्या संगनमताने हे सर्व चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. आहे त्याच समृध्दी महामार्गाचा बॅण्ड वाजला असून अनेक अपघात या महामार्गावर होत आहेत. जळालेल्या बसला व त्यातील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना आता शक्तीपीठाचा महामार्ग असे नवे गोंडस नाव देत शेतकर्‍यांना फसविण्याचे काम सरकारकडून होत आहे. नव्याने निर्माणाधीन असलेल्या या शक्तीपीठ महामार्गाव्दारे नागपूर आणि गोवा तसेच विविध तिर्थक्षेत्र जोडण्याची मिंधे सरकारची योजना असून या प्रस्तावित महामार्गासाठी 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

आठशे किलोमीटरच्या लांबीचा हा महामार्ग असून एकूण बारा जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे त्यात नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या महामार्गास अर्धापूर तालुका व परिसरातील शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध असताना हा घाट का रचला जात आहे, असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेत त्यांची कवडीमोल किंमत काढून त्या अधिग्रहीत करण्याचा सरकारचा घाट आहे. याआधीच्या समृध्दी महामार्गामुळे तुमची समृध्दी झाली आणि आमदाराचा पन्नास कोटीचा रेट निघाला, असा आरोपही त्यांनी केला आहे. हा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मालेगाव, अर्धापूर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.