शिक्षण संस्थेतील अनियमितता आणि हरिण प्रकरणी डॉ. भास्कर मोरेवर कडक कारवाई‎ करावी, आमदार राम शिंदे यांची मागणी

रत्नदीप मेडिकल महाविद्यालय संस्थेतील अनियमितता आणि हरिण पाळल्याप्रकरणी अध्यक्ष भास्कर मोरे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी शनिवारी अधिवेशनात रत्नदीप मेडिकल महाविद्यालयासंदर्भात सभागृहात लक्षवेधी मांडली. विद्यार्थी व विद्यार्थिंनींचे इतर ठिकाणी स्थलांतर करावे, हरिण प्रकरणाची चौकशी करावी, “रत्नदीप’च्या सर्व मान्यता रद्द करून शासकीय स्तरावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

शिंदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना जामखेड येथील रत्नदीप मेडिकल महाविद्यालय या संस्थेवर कारवाई करून उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत चौकशी करून मान्यता रद्द करण्यात येईल. हरिण प्रकरणी वनविभागा मार्फत शासकीय स्तरावर चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

आमदार मनिषा कायंदे यांनीही या संस्थेला ज्या समिती सदस्यांनी मूल्याकंन करून खोटे रिपोर्ट दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात करण्याची मागणी केली. यावर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही संस्थेला ज्या अधिकारी यांनी परवानगी दिल्या आहेत, त्या कशा दिल्या याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे असे मुश्रीफ म्हणाले.