भाजपविरोधात जनतेत मोठा संताप असून, आपला विश्वासघात झाल्याची भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे भाजपच्या दाव्यानुसार 400 पार वगैरे काही नाही. हा भाजपचा माइंड गेम असून, ग्राउंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, असा हल्लाबोल आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील गावभेट दौऱयास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल आदी उपस्थित होते.
माझ्या रक्तात काँग्रेस आहे, माझे विचार काँग्रेसचे आहेत. मी सर्वधर्म समभाव जपणारी व्यक्ती आहे आणि भाजप सर्वधर्म समभावविरोधी आहे. त्यामुळे भाजपचे विचार पटत नाहीत, असेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
आमदार शिंदे म्हणाल्या, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मागील 10 वर्षांत प्रलंबित राहिले, त्यामुळेच मतदारसंघाचा विकास झालेला नाही. मंगळवेढा सिंचन योजना काँग्रेस सरकारने मंजूर केली; मात्र ती यांना पूर्ण करता आली नाही. उजनीच्या पाण्याचे नियोजन सरकारला करता आलेले नाही, त्यामुळे जिह्यात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. भीमा नदीचे प्रदूषण हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे, असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
भाजपवाल्यांना घरबंदी करा
आमदार शिंदे म्हणाल्या, मराठा समाजाचे युवक गावोगावी गेल्यानंतर आरक्षणाविषयी बोलत आहेत. महाविकास आघाडी मराठा आरक्षणाचे समर्थन करीत आहे. मात्र, भाजप सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. मराठा बांधवांनी आम्हाला गावबंदी केली, तर याच फायदा भाजपवाल्यांना होणार आहे. कारण मोदी सरकारचे सगळे खोटे उघडे पडू नये, असे भाजपला वाटते. म्हणूनच सर्व नेत्यांना गावबंदी केलेली भाजपला हवी आहे. त्यामुळे मराठा समाजाने आम्हाला गावबंदी न करता भाजपला ‘घरबंदी’ करा, असे सांगत भाजपच्या नेत्यांना दारात फिरकू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.