राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीला शनिवार, 6 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी व इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष युक्तिवादाला 16 जानेवारीला प्रारंभ होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात बारा दिवसांचे वेळापत्रक तयार केले असून 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आमदार अपात्रताप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिका व त्यावरील उत्तरे उद्या, शनिवारी परस्परांना सोपवण्यात येतील. 9 जानेवारीला फाईल्स किंवा अतिरिक्त कागदपत्रे पटलावर ठेवली जातील. दोन्ही गटाकडून या याचिकेच्या संदर्भात सादर झालेल्या कागदपत्रांची पडताळणी 11 व 12 जानेवारीला होईल. सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी अर्ज करण्यासाठी 14 जानेवारीचा दिवस ठेवला आहे. 16 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्षात पहिली सुनावणी आणि सुनावणीचा विषय नक्की होईल. 18 जानेवारी रोजी कागदपत्रे सादर होतील.
अजित पवार गटाच्या आमदारांची 20 जानेवारीला तर मूळ राष्ट्रवादी पक्षातील आमदारांची 23 जानेवारी रोजी उलटतपासणी होईल. 25 आणि 27 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे अंतिम युक्तिवाद होतील. सुनावणीच्या वेळापत्रकाचा हा तपशील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना पाठवण्यात आला आहे.