दहशतीमुळेच जनतेने त्यांना नाकारले – बाळासाहेब थोरात

‘नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीब अशी होती. लंके सामान्य परिवारातील असून, संघर्षातून पुढे आले आहे. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधाऱयांनी दडपशाहीचा वापर सुरू केला. जिह्यात त्यांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेर, पारनेरसह सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. संपत्ती, सत्ता असतानाही अघोरी दहशतीच्या वापरामुळे जनतेने त्यांना नाकारले,’ असा हल्लाबोल काँगेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांचे नाव न घेता लगावला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर खासदार नीलेश लंके यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, चेअरमन बाबासाहेब ओहोळ, प्रभावती घोगरे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, अरुण पा. कडू, शंकरराव पा. खेमनर, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, अमर कतारी, जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, ‘जीवाला जीव देणारी माणसे लंके यांनी निर्माण केली आहेत. लंके हे अभ्यासू असून, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. दिल्लीतही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवावा. तसेच जिह्यामध्ये समविचारी लोकांना एकत्र घेऊन येणारी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था लढवू,’ असेही त्यांनी सांगितले.

खासदार लंके म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढय़ शक्तीशी होती. अशा लढाईत आमदार थोरात यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असून, त्यांनी विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली,’ असे गौरवोद्गार लंके यांनी काढले. दरम्यान, ‘निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक प्रकार केले. धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले, नागरिकांच्या बोटाला बाहेर शाई लावण्याचा प्रयत्न केला, तरीही जनतेने त्यांना साफ नाकारले,’ असे लंके म्हणाले.