मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात स्टॅलिन यांनी दंड थोपटले, 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली, BJP च्या CM लाही निमंत्रण!

लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचनेचा मुद्दा सध्या देशभरात गाजत असून अनेक राज्यांनी याला आपला विरोध दर्शवला आहे. याच मुद्यावर 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बैठकीसाठी बोलावलं आहे. स्टॅलिन यांनी ज्या 7 मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपशासित ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांचाही समावेश आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एमके स्टॅलिन यांनी या सर्व मुख्यमंत्र्यांना केंद्राच्या प्रस्तावित मतदारसंघांच्या पुनर्रचनेला विरोध करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणाऱ्या बैठकीसाठी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी, ममता बॅनर्जी आणि मोहन चरण माझी यांना निमंत्रित केले आहे.

दरम्यान, राज्यात लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. तामिळनाडूप्रमाणेच अनेक राज्यांवरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल. यामुळे आता अनेक राज्य सरकार याचा विरोध करत आहेत.