
उत्तराखंडमधील भाजपच्या पुष्कर धामी सरकारने घाऊक प्रमाणात नामबदलाचा निर्णय घेत तब्बल 15 ठिकाणांची नावे बदलली आहेत. मात्र डेहराडूनच्या मियाँवालाचे रामजीवाला असे नावबदल करण्याचा सरकारचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता आहे. या नावातील मियाँ या शब्दावर भाजपचा आक्षेप होता. मात्र, मियाँ या नावाचा मुघली राजवटीशी काहीही संबंध नसून स्थानिकांनी या नामबदलाला जोरदार विरोध केला आहे.
डेहराडूनमधील बहुतांश रहिवाशी राजपूत समाजातील आहेत. मियाँवाला हा शब्द त्यांच्या अनेक शतकांच्या इतिहासाची साक्ष देणारा आहे. राजपूत समाजातील थोर व्यक्तींना ही उपाधी दिली जात होती. अजुनही इथल्या राजपूत घराण्यांमध्ये काहींचा उल्लेख मियाँ या उपाधीने केला जातो. मियाँवालावासीयांच्या वंशज गढवाली राजांनी जीवावर उदार होत या गावांचे रक्षण केले. गावाचे नाव बदलू नये, अशी मागणी स्थानिकांनी केली.