ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

आय एम ए डिस्को डान्सर… म्हणत हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत X या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे.

चित्रपट सृष्टीत अत्यंत मानाचा मानला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपट सृष्टीवर बराच काळ अधिराज्य केलं. त्यांच्या डिस्को डान्सचे चाहते तर परदेशातही आहेत. आपली संवाद शैली, नृत्य, अभिनय याच्या जोरावर त्यांनी हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत एक ओळख निर्माण केली. सोबतच देशापरदेशात हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीचे मोहर उमटवली. यामुळे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 17 व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी या पुरस्काराने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

याआधी 2024 मध्ये त्यांना देशातील नागरी पुरस्कातील एक पद्मभूषण पुरस्कार ही मिळाला होता . तसेच तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात रामकृष्ण परमहंस यांची त्यांनी केलेली भूमिका देखील चांगलीच गाजली होती. त्या भूमिकसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.