बेपत्ता वनगा दोन दिवसांनी घरी परतले, शिंदेंच्या पालघर जिल्हाप्रमुखाने षड्यंत्र करून तिकीट कापल्याचा आरोप

पालघर विधानसभेतून तिकीट कापल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवल्यानंतर अचानक बेपत्ता झालेले मिंध्यांचे आमदार श्रीनिवास वनगा दोन दिवसांनी आज घरी परतले. याविषयी माहिती देताना त्यांनी आपण आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्याचे सांगतानाच शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख पुंदन संख्ये व राजेंद्र गावीत यांनी माझ्याविरोधात कट रचून आपले विधानसभेचे तिकीट कापल्याचा आरोप केला. तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेले वनगा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवमाणूस असून त्यांच्यामुळेच मी आमदार झालो अशी कृतज्ञता व्यक्त करतानाच एकनाथ शिंदेंनी माझा घात केला असा हल्लाबोल वनगा यांनी केला. ही टीका जिव्हारी लागल्याने शिंदे गटातून त्यानंतर जोरदार हालचाली झाल्याचे बोलले जात आहे.

टेबलावर नाचणाऱ्या आमदारांमध्ये मी नव्हतो 

घरी परतल्यानंतर वनगा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी माझ्या नातेवाईकांच्या घरी गेलो होतो. माझ्या मुलाची प्रकृती ठीक नाही. आईचीदेखील तब्येत बरी नाही. यापुढे मला कुटुंबासाठी जगायचे आहे. त्यामुळे मी आता शांत राहून पुढची भूमिका घेईन असेही त्यांनी सांगितले. तसेच गोव्यात जेव्हा सर्व आमदार नाचत होते, तेव्हा मी त्यांच्यात नव्हतो. मी माझ्या खोलीवर होतो अशी माहितीदेखील वनगा यांनी दिली.