मीरा रोडची शिवसेना शाखा पोलिसांनी घातली मिंध्यांच्या घशात, खाकी वर्दी कुणाच्या दबावाखाली; शिवसैनिकांमध्ये प्रक्षोभ

मीरा रोडच्या पूर्व भागात पुनम गार्डन येथे असलेली शिवसेना शाखा पोलिसांनी मिंधे गटाच्या घशात घातली आहे. ही शाखा हडप करण्यासाठी गद्दारांची टोळी आली असता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांना कडाडून विरोध केला होता. त्यामुळे गद्दारांना त्या ठिकाणाहून पळ काढावा लागला होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या शाखेला पोलिसांनी टाळे लावले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी घेऊन पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या शाखेचा ताबा मिंधे गटाकडे दिला. पोलिसांच्या या मिंधे धार्जिण्या कारभारामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून खाकी वर्दी कुणाच्या दबावाखाली काम करते, असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

शासकीय यंत्रणांचा गैरवापर
पुनम गार्डन येथील शिवसेनेची ही शाखा हडप करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. मात्र शिवसैनिकांनी तो प्रत्येक वेळी हाणून पाडला. त्यामुळे आता मिंधे गटाने शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून ही शाखा बळकावली आहे. मिंध्यांच्या एका पदाधिकाऱ्याने या शाखेची कर आकारणी आणि वीज बिल महापालिका प्रशासन आणि वीज मंडळातील अधिकारी यांच्यावर दबाव आणून स्वतःच्या नावावर केले आहे. या खोडसळपणाचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे.

पुनम गार्डन येथील शिवसेना शाखा 2007 मध्ये उभा करण्यात आली आहे. तेव्हापासून या शाखेत गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम सुरू होते. मिंध्यांच्या गुंडांनी ही शाखा हडप करण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसैनिकांनी तो हाणून पाडला. २७जानेवारी रोजी मिंध्यांचे गुंड शाखा हडप करण्यासाठी आले असता शिवसैनिकांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शाखेला दोन टाळे लावले. या वादावर तोडगा काढण्यासाठी हे प्रकरण मुख्यालय पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे देण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शिवसेनेची ही 18 वर्षांपूर्वीची शाखा उपायुक्तांनी मिंधे गटाच्या घशात घातली. पोलिसांच्या या पक्षपाती निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार
पुनम गार्डन येथील शाखा मिंधे गटाने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हडप केली आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला आहे. मात्र या दडपशाहीला शिवसैनिक घाबरणार नाहीत. या शाखेत गेल्या १८ वर्षांपासून गोरगरीबांच्या अडचणी सोडवल्या जात होत्या. मिंधे गटाच्या आडमुठेपणामुळे ही शाखा गेल्या अडीच महिन्यांपासून बंद होती. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी ही शाखा मिंध्यांच्या घशात घातली आहे. पोलिसांच्या या मनमानी निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया उपजिल्हा संघटक प्राची पाटील यांनी व्यक्त केली आहे.