मीरा रोडमध्ये अतिक्रमण पथकावर हल्ला; महिला पोलीस अधिकाऱ्याचेही डोके फोडले

बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण पथकावर हल्ला केल्याची घटना मीरा रोडच्या शांती पार्कमध्ये घडली आहे. यावेळी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यातदेखील काठी मारल्याने त्यांचे डोके फुटले आहे. इतकेच नाही तर काही पोलिसांना हल्लेखोरांनी नखांनी ओरबडले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळावर धाव घेतली.

मीरा रोड पूर्वेला शांती पार्क भागात एका इमारतीच्या मनोरंजन मैदानाच्या जागेवर श्री गोवर्धन नाथजी हवेली व जय श्री बाल गोपाळ मंडळाने बेकायदा बांधकाम केले होते. यावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र बांधकाम तोडत असताना राकेश कोटीयन यांच्यासह १० ते १५ जणांनी कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली. जेसीबी अडविण्यात आल्याने पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राकेश कोटीयन याला बाजूला करत असताना त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वसन विरडिया या महिलेने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यात काठीने हल्ला केला. यात बुरांडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पाचजणांवर गुन्हा

जमावामधील भावना बगालिया, सुनीता विरडिया, जयश्री सवानी यांनी महिला पोलीस अंमलदार लालन खोजे यांच्या हातांवर नखांनी ओरबाडे केले. याप्रकरणी आरोपी राकेश कोटीयन, वसन विरडिया, भावना बगालिया, सुनीता विरडिया, जयश्री सवानी आदींविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.