मीरा-भाईंदर पालिका प्रशासन ठेकेदारावर मेहेरबान, ‘टक्क्या’साठी बाजार फी वसुलीचा ठेका 10 कोटींनी वाढवला

मीरा-भाईंदर महापालिकेकडून उत्पन्न वाढवण्याच्या गोंडस नावाखाली बाजार फी वसुलीचे नवीन कंत्राट तब्बल 10 कोटींनी वाढवून दिले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या बाजार फीमध्ये तब्बल 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीचे कारण दिले जात असले तरी अधिकाऱ्यांच्या कमिशनच्या ‘टक्क्या’साठी आमच्या रोजीरोटीवर घाला घातल्याचा संताप फेरीवाल्यांमधून व्यक्त होत आहे.

पालिकेने यंदा नव्याने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत ओडीएस प्रोटेक्टिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बाजार फी वसुलीचा तब्बल 32 कोटी 73 लाखांचा ठेका तीन वर्षांकरिता दिला आहे. तर गतवेळी 7 कोटी 48 लाखांना वार्षिक ठेका देण्यात आला होता. पालिकेकडून याआधी बाजार फी वसुलीचा वार्षिक ठेका दिला जात होता. यंदा तो तीन वर्षांसाठी देण्यात आल्याने एका विशिष्ट कंपनीला लाभ देण्यासाठीच तीन वर्षांचा ठेका देण्यात आला. यामध्ये काही अधिकाऱ्यांनी आपले हात ‘ओले’ केल्याची चर्चा आहे. नवीन ठेका देताच बाजार फी वाढवली आहे. यापूर्वी फेरीवाल्यांकडून 60 रुपये बाजार फी वसूल केली जात होती. यंदा त्यात 50 टक्क्यांची वाढ करून ती 90 रुपये इतकी करण्यात आली आहे. दिवसभर व्यापार करून पाचशे, हजार रुपये मिळताना नाकीनऊ होते. त्यातील 90 रुपये ठेकेदाराला दिल्यावर आमच्या हातात काही शिल्लक राहत नाही, असे फेरीवाल्यांनी सांगितले.

कॉण्ट्रॅक्टरच्या दिमतीला पालिका कर्मचारी वाढीव

फीला विरोध करणाऱ्या फेरीवाल्यांकडून नवीन दराने फी वसूल करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक कॉण्ट्रॅक्टरच्या दिमतीला दिले आहेत. पालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडत असल्याने पालिका ठेकेदारावर एवढी मेहेरबान का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वसुली 120 ची मात्र पावती 90 ची

बाजार फी वसुलीच्या निमित्ताने मागील भ्रष्ट प्रशासकीय राजवटीतील पुनरावृत्ती आताही पाहायला मिळत असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून होत आहे. आठवडा बाजारात तर 100, 120रुपये बाजार फी वसूल केली जात असून पावती मात्र 90 रुपयांचीच दिली जात असल्याचा आरोपही फेरीवाल्यांनी केला.