अल्पसंख्याक महाविद्यालयांना अकरावी प्रवेशात अडचणी, कोटा प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची नावेच अल्पसंख्याक यादीत नाहीत

अल्पसंख्याक महाविद्यालयांना अकरावी कोटा प्रवेश राबविताना अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रहलादराय दालमिया लायन्स या हिंदी भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयाने याबाबत शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पोर्टलवरून या महाविद्यालयाला आलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या यादीत हिंदी वगळता अन्य विद्यार्थ्यांचीच नावे आहेत. बिगर हिंदी अल्पसंख्याकांना कोटय़ातून प्रवेश देण्यास विद्यालयाने नकार दिला आहे.

दालमिया महाविद्यालयाला हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महाविद्यालयाने शिक्षण विभागाला निवेदन दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अकरावी प्रवेशाच्या शून्य प्रवेश फेरी वेळी अनेक पात्र हिंदी भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालयात संपर्क साधत होते. मात्र या विद्यार्थ्यांची नावेच अल्पसंख्याकांच्या प्रवेश सूचीमध्ये नाहीत. त्यामुळे नियमानुसार त्यांना प्रवेश देता आलेला नाही, असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग 2 मध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक वर्गात अर्ज केला आहे. परंतु त्यांची नावेच यादीत नसल्याने महाविद्यालयाला या विद्यार्थ्यांना प्रवेश देता आलेला नाही. पाल्याला पुन्हा प्रवेश अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

हिंदी भाषिक समाजाप्रति सरकार उदासीन

राजस्थानी, उत्तर हिंदुस्थानी आणि सर्व हिंदी भाषिक समाजाच्या लाभार्थ सरकारद्वारे चालविण्यात येणाऱया या योजनेचे व्यवस्थिरीत्या संचालन न होणे हे सरकारचे हिंदी भाषिक समाजाच्या प्रति उदासीनतेचे प्रतीक आहे, अशी तक्रार महाविद्यालयाने केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून अल्पसंख्याक महाविद्यालयांना सरळ प्रवेश देण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

– विविध कारणांमुळे दालमिया महाविद्यालयात अकरावीत आतापर्यंत फक्त 2 विद्यार्थी अनुदानित वर्गात (एकूण 1080 प्रवेश क्षमतेपैकी 540 अल्पसंख्याक वर्गाकरिता) व 2 विद्यार्थी विना अनुदानित वर्गात (एकूण 120 प्रवेश क्षमतेपैकी 60 अल्पसंख्याक वर्गाकरिता) एवढेच विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.
– कोटा प्रवेशाच्या पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या अनुदानित वर्गातील 166 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी इतर अल्पसंख्याक आहेत व विना अनुदानित वर्गातील 51 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी इतर अल्पसंख्यांक आहेत.
– हे विद्यार्थी हिंदी भाषिक अल्पसंख्याक नसल्यामुळे महाविद्यालय त्यांना प्रवेश देण्यास असमर्थ आहे. मात्र यामुळे प्रवेश क्षमतेवर खूप विपरीत परिणाम होत आहे, असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे.