गुजरातमधील वडोदरा शहरातील मैली येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य तीन आरोपींसह 5 जणांना अटक केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल 1 हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 70 हजारांहून अधिक फुटेज तपासले. घटनास्थळी सापडलेला चष्मा आणि फोन कॉलवरून आरोपींचा माग काढणे सोपे झाले. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा देशात महिला सुरक्षित नसल्याचेच उघड झाले आहे.
तिन्ही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते काही वर्षांपासून वडोदरा येथील तांदलजा भागात राहत होते. मुन्ना अब्बास बंजारा (27), मुमताज ऊर्फ आफताब सुभेदार बंजारा (36) आणि शाहरुख किस्मत अली बंजारा (26) अशी आरोपींची नावे आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींनी पीडितेचा मोबाईल फोनही सोबत नेला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी फोन केला असता आरोपीने फोन घेतला, मात्र तो बोलला नाही. यावेळी घरातील सदस्यांना गरब्यात ढोल-ताशांचा आवाज ऐकू आला. या कालावधीत मोबाईल 7 सेकंद चालू राहिला. मोबाईलचे लोकेशन अकोटा परिसरातील होते. यानंतर आरोपीने फोन बंद करून फेकून दिला. पोलिसांना घटनास्थळावर आरोपीचा चष्माही सापडला. यानंतर पोलीस पथकाने अकोटा अकोटा परिसरातील फुटेज तपासले आणि ते आरोपींपर्यंत पोहोचले.
नेमके काय घडले?
11 वीत शिकणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री साडेअकराच्या सुमारास मैली भागातील एका निर्जन रस्त्याच्या कडेला तिच्या मित्रासोबत बसली होती. यादरम्यान दोन दुचाकींवरून 5 तरुण तिच्याजवळ आले. त्यांनी दोघांना तुम्ही इथे काय करताय असे विचारले आणि मुलाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघे निघून गेले आणि तिथे थांबलेल्या तिघांपैकी एकाने मुलाला पकडून ठेवले आणि अन्य दोघांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिसऱ्या आरोपीनेही पीडितेचा शारीरिक विनयभंग केला आणि तिघेही पीडितेचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर या घटनेबाबत पीडितेने आपल्या मित्राच्या मोबाईलवरून पोलिसांना माहिती दिली आणि तालुका पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली.