वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वडील ओळखीचे असल्याचे सांगून नेले

कांजूरमार्ग येथे एका पोलीस अंमलदाराच्या सतर्कतेमुळे 14 वर्षांच्या मुलीची एका नराधम वृद्धाच्या तावडीतून सुटका झाली. वडिलांकडे नेतो असे सांगत तो नराधम मुलीला कांजूरमार्ग येथे घेऊन गेला आणि कंटेनरमध्ये तिच्यासोबत दृष्कृत्य केले.

कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोसे हे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना चामुंडा नगर येथील मेनन कॉलेजसमोरच्या नाल्याच्या बाजूला असलेल्या कंटेनरजवळ एक वृद्ध इसम दिसला. त्यांना संशय आल्याने तसेच बाजूला असलेल्या कंटेनरमधून दरवाजा वाजवून ओरडल्याचा आवाज आल्याने पोसे यांनी कंटेनर उघडून पाहिले तेव्हा आतमध्ये 14 वर्षांची मुलगी दिसली.

पोसे यांनी चौकशी केल्यावर वृद्धाने स्वतःचे नाव मुख्तार अहमद मोहंमद शेख (70) असे सांगून ती मुलगी ही स्वतःची नात असल्याचे सांगितले. परंतु तो दिशाभूल करतोय असे दिसू लागताच पोसे यांनी निर्भया पथकाच्या सपोनि चव्हाण यांना घटनास्थळी बोलावले. मग चव्हाण यांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केल्यावर तिने ती मध्य मुंबईत राहत असल्याचे सांगितले. शेखने मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. तुला त्यांच्याकडे नेतो असे सांगून आधी कुर्ला येथे आणले. मग कांजूरमार्गला आणले. त्यानंतर कंटेनरमध्ये लैंगिक शोषण केल्याचे मुलीने सांगितले.