परप्रांतीय कामगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना जालना रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी कदीम जालना पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. फैजान खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जालना रेल्वे स्टेशन परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी पीडितेचे वडील वॉचमनची नोकरी करतात. यामुळे पीडितेचे कुटुंब तेथेच राहते. आरोपीही याच इमारतीत फरशी बसवण्याचे काम करत होता. चार दिवसांपूर्वी पीडिता इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळत टाकण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्यावर बाथरुमध्ये बळजबरीने नेत बलात्कार केला. मात्र बदनामीच्या भीतीने पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
रविवारी दुपारी पीडिता कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता आरोपीने पुन्हा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरडा करताच आरोपी पळून गेला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच अॅट्रोसिटी कायदा आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरू करत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीच्या रेल्वे स्टेशन परिसरातून मुसक्या आवळल्या.