राजधानी दिल्लीतील वेगवेगळ्या शाळांना ई-मेलद्वारे धमक्या प्राप्त झाल्याने शाळा प्रशासनामध्ये घबराट पसरली होती. यापैकी शेवटचे 23 बॉम्ब धमकीचे मेल करण्यामागे 12वीतील विद्यार्थ्याचा हात असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी आज ही माहिती देताना संबंधित विद्यार्थ्याने कबुली दिली असून त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे धमकीचे मेल पाठवले असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील तीन शाळांना त्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी धमकीचा मेल केला होता. मागील काही दिवस सातत्याने दिल्लीतील शाळांना बॉम्ब धमकीचे मेल प्राप्त झाले. त्यामुळे शाळेच्या वेळेत व्यत्यय आला. डिसेंबर 2024मध्ये तर 72 तासांच्या आत शाळांना बॉम्बने उडवू, अशी धमकी देऊन पैशांची मागणी करणारा मेल आला होता. 9 डिसेंबर 2024पासून दिल्लीतील शाळांना धमक्यांची मालिका सुरू झाली.