
बहुमजली इमारतींमुळे हवामान खात्याला पावसाचा अंदाज घेताना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यात अंदाज चुकण्याचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मुंबईत चार एक्स बँड रडार बसवले असून 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली आहे. त्यामुळे अतिवृष्टीची माहिती 5 ते 6 तास आधीच मिळणार असून संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
केरळ राज्यातील वायनाडमध्ये घडलेल्या पूर दुर्घटनेपासून धडा घेत केंद्र सरकारने मुंबईत हवामान खात्याची प्रणाली भक्कम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शहरात मागील काही वर्षांत अनेकदा अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. त्या पावसाबाबत अंदाज वर्तवण्यात हवामान खाते असमर्थ ठरले होते. परिणामी, मुंबईकरांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले.
वायनाडच्या पूरस्थितीचा विचार करता सरकारने हवामान खात्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. त्या अनुषंगाने पर्यावरणवादी तसेच हवामान तज्ञांकडून जोरदार मागणी झाल्यानंतर केंद्र सरकारने मुंबई शहरातील विविध ठिकाणी अद्ययावत पद्धतीचे चार एक्स ब्रँड रडार बसवले आहेत. हे रडार पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यात मोलाची मदत करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रत्येक हवामान केंद्रावरील पाऊस, विजांचा कडकडाट आणि समुद्रातील लाटांच्या लहरी मोजणी शक्य होणार आहे.
पहिला प्रयोग मुंबईत
अतिवृष्टीचा इशारा वेळीच देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने देशात सर्वात आधी मुंबईत एक्स ब्रँड रडार बसवण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. शहरातील बहुमजली इमारतींमुळे त्या इमारतींच्या खालच्या उंचीवरील ढगांचा अभ्यास करणे कठीण काम होते. त्या ढगांची स्थिती, वाऱ्यांचा वेग याचे बारकावे नोंदवले जात नव्हते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पावसाचा रुद्रावतार मुंबईकरांनी अनुभवला. 24 सप्टेंबर रोजी सर्वाधिक पाऊस नोंद झाला होता. तशा प्रकारच्या पावसाचा काही तास आधी अंदाज कळल्यास प्रशासन अलर्ट मोडवर राहू शकते. याच दृष्टिकोनातून चार एक्स ब्रँड रडार उपयुक्त ठरणार आहेत. हे रडार तसेच 139 स्वयंचलित हवामान केंद्रे अतिवृष्टीचा अंदाज किमान पाच ते सहा तास आधी देता येणार आहे.