मंत्र्यांनी मंत्रालयातून गाशा गुंडाळला, पण मंत्रीपदाच्या पाट्यांचा मोह आवरेना; मुख्यमंत्र्यांनी ‘लाडकी’ लाकडी खुर्ची घरी नेली

महायुती सरकारमधील मंत्र्यांनी मंत्रालयातल्या दालनांतून गाशा गुंडाळला आहे. सर्व मंत्र्यांची दालने रिकामी करण्याची लगबग सुरू आहे. मंत्र्यांच्या दालनात फाडलेले पेपर्स, जुन्या फायली आणि रद्दीचे ढीग जमिनीवर सर्वत्र विखुरलेले आहेत. आज संध्याकाळी बहुतांश मंत्र्यांची दालने ‘सील’ झाली आहेत. पण तरीही दालनाबाहेरच्या नावाच्या पाटय़ांचा मोह अद्याप मंत्र्यांना सुटलेला नाही.

सरकार विसर्जित झाल्यावर मंत्र्यांचाही कार्यकाल संपला आहे. त्यामुळे मंत्र्यांची दालने रिकामी करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत. त्यामुळे सर्वच मंत्र्यांची दालने रिकामी करण्याची लगबग सध्या सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचे दालन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीविना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या खर्चाने त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या दालनात लाकडी खुर्ची आणली होती, असे सांगण्यात येते. पण आता पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, असे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची लाकडी खुर्ची कोणालाही खास करून माध्यमांना कुणकुण न लागता मंत्रालयातून गुपचूप बाहेर काढल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे दालन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीविना असल्याचे सांगण्यात येते.

दालनाबाहेरच्या पाटय़ा तशाच

मंत्र्यांनी दालने रिकामी केली असली तरी एकाही मंत्र्यांच्या दालनाबाहेरील मंत्रीपदाच्या नावाची पाटी अद्याप काढलेली नाही. आपल्याला पुन्हा तेच मंत्री पद मिळेल या आशेवर अनेक मंत्री आणि त्यांचा स्टाफ आहे. एखाद्या मंत्र्याला तेच खाते मिळाले तर उगाचच मंत्र्यांचा रोष नको म्हणून सरकारी कर्मचारीही नावाच्या पाटीला हात लावण्यास धजावले नाहीत. आता या पाटय़ा त्यांच्या राहातील की नवीन नावाच्या पाटय़ा बघायला मिळतील याचे चित्र पुढील आठवडय़ात स्पष्ट होईल, असे कर्मचारी खासगीत सांगतात.

दालने होणार सील

सर्व मंत्र्यांची दालने सील करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केली आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या दालनातील भलेमोठे टीव्ही-सोफा काढण्यात आले आहेत. कम्प्युटरही काढले आहेत. माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनातील सोफे टेंपोत भरण्यात आले. पण हे सोफे एमआयडीसीचे असल्याचे समजल्यामुळे पुन्हा त्यांच्या दालनात नेऊन ठेवण्यात आले. मंत्रालयातल्या कोणत्याही मजल्यावर फेरफटका मारला तर मंत्र्यांच्या दालनातील सामान- कागदपत्रे, लोखंडी ट्रॉलीवर टाकून बाहेर नेतानाचे दृश्य बघायला मिळत होते. कागदपत्रे फाडून टाकल्यामुळे बहुतांश मंत्र्यांच्या दालनात कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.