भगवती रुग्णालयाची खासगीकरणातून सुटका, शिवसेनेच्या लढय़ाला मोठे यश

मुंबई महापालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम 31 मेपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार नाही. मुंबई महापालिका किंवा धर्मादाय संस्थेकडून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर ते चालवले जाईल. त्याचबरोबर तिथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीबांना वैद्यकीय सेवा देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खासदार पियूष गोयल यांनी दिले. दरम्यान, भगवतीचे खासगीकरण करू नये, अशी मागणी शिवसेनेने सातत्याने केली होती. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील याबाबत आवाज उठवला होता.

भगवती रुग्णालयाचा आधार मुंबईकरांसह पश्चिम उपनगरे तसेच विरार, वसई अगदी पालघर जिह्यांपर्यंतच्या गरीब रुग्णांना होत आहे. त्यामुळे भगवतीचे खासगीकरण थांबवून पालिकेनेच अद्ययावत आणि सुसज्ज असे रुग्णालय तातडीने सुरू करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. याची दखल घेत केंद्रीय मंत्री गोयल यांनी भगवती रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

मागाठाणे, कांदिवली, गोराईत नवीन रुग्णालये

बोरिवली येथील मागाठाणे येथे एक हजार खाटांच्या रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे. कांदिवली पश्चिम येथेही एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. गोराई येथे नव्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये गरीबांना योग्य वैद्यकीय सेवा देण्यासाठी आयुष्मान योजनेअंतर्गत सेवा पुरवली जाणार आहे.