
सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न एकीकडे गांभीर्याने घेतला असतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे वैद्यकीयचा अभ्यास करताना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटाच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने याकरिता पुढाकार घेत टास्क फोर्स नेमला आहे, परंतु केंद्र सरकारकडे विविध सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची नोंदच नसल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील, याकरिता कोणत्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत, याबद्दल राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसांचे योग मॉडेल तयार करण्यात आल्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.
एमबीबीएसमध्ये योग
एमबीबीएसच्या अभ्यासक्रमातही योगचा समावेश करण्यात येणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले. याच महिन्यात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 53 टेली मानस केंद्रांची उभारणी केल्याचे ते म्हणाले.