
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या नातेवाईकांना नियमानुसार आर्थिक मदत केली जात नसल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
राज्यातील अनेक जिह्यांत विविध कारणास्तव शेतकऱयांच्या आत्महत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यांना अद्यापही नियमानुसार आर्थिक मदत दिली जात नाही ही बाब खरी आहे का? असा तारांकित प्रश्न चेतन तुपे व अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात मकरंद पाटील यांनी आत्महत्या वाढत असल्याचे मान्य केले आहे. तसेच नियमानुसार देय असलेली मदतही दिली जात नसल्याचे मान्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागात जास्त आत्महत्या प्रकरणांची नोंद झाली आहे.
कर्जबाजारीपणा प्रमुख कारण
शेतकऱयांच्या आत्महत्यांमागे नापिकी, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका किंवा मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने होणारा कर्जबाजारीपणा, कर्जपरतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास मृत शेतकऱयांच्या नातेवाईकांच्या वारसांना मदत करण्यात येते. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत शेतकऱयांच्या वारसांना देण्यात येणाऱया रकमेच्या धर्तीवर वाढ करण्याचे कोणतेही धोरण नाही, असेही स्पष्ट केले आहे.