दुधाच्या प्रश्नावर राज्यातील मंत्री जनतेची दिशाभूल करत आहे; निलेश लंके यांचा हल्लाबोल

दुधाच्या प्रश्नाचा व गृहमंत्र्यांचा काय संबंध आहे, एक प्रकारे राज्यातील मंत्री हे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, अशी टीका महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केली. दुधाचा प्रश्न सोडवला नाही, तर मुंबईमध्ये आम्ही मोर्चा काढू असा इशाराही निलेश लंके यांनी सरकारला दिला.

कांदा व दुधाच्या प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलन नगर येथे करण्यात येत आहे. यावेळी लंके म्हणाले की, कांदा व दुधाचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसामान्य नागरिकांची निगडित असलेला प्रश्न सुटला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. या प्रश्नाबाबत आपण आंदोलन करत आहोत. काल राज्याचे मंत्री दिल्लीमध्ये गेले व त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली, असे विचारल्यानंतर लंके यांनी गृहमंत्र्याचा व कांद्याचा दुधाचा काय संबंध असा सवाल केला. मी ज्या वेळेला दिल्लीमध्ये होतो, त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे व आम्ही सर्वजण या खात्याचे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे गेलो. त्यांना दुधाचा प्रश्न सांगितल्यावर त्यांनी हा प्रश्न राज्याच्या अखत्यारीत असल्याने तुम्ही त्यांच्याशी बोलावे, असे सांगितले. त्यानुसार आम्ही आता या प्रश्नासंदर्भामध्ये निश्चितपणे आवाज उठवणार आहोत. राज्यातील मंत्री या प्रश्नाबाबत जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात शेतकऱ्यांच्या या विषयाला न्याय दिला नाही तर आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करू, असा इशारा लंके यांनी दिला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून चा हा प्रश्न प्रलंबित आहे वास्तविक पाहता कांद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये केंद्राने वेळीच जर भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले. आज इतर राज्यातील कांदा देशाबाहेर जातो, मात्र आपल्या कांद्याला भाव मिळत नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असेही लंके म्हणाले.