लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात रसिकांची हुल्लडबाजी नवी नाही. पण बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीत सिल्लोडचे मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या गुंडागर्दीमुळे रसिक प्रेक्षकांवर पोलिसांच्या लाठय़ा खाण्याची वेळ आली! कार्यक्रमात होणारी रेटारेटी पाहून सत्तार भडकले आणि त्यांनी थेट ‘लोकांच्या xxx हाड मोडेपर्यंत मारा’ असे फर्मानच पोलिसांना सोडले.
मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दहा दिवसांचा सिल्लोड महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात बुधवारी गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमी पाटील आणि प्रेक्षकांची हुल्लड हे ठरलेलेच आहे. गर्दी होणार हे लक्षात घेऊन भराडी रोडवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. गौतमी पाटील व्यासपीठावर येताच तरुण प्रेक्षकांनी सिल्लोड डोक्यावर घेतले. रेटारेटी सुरू झाली. हे पाहून अब्दुल सत्तार स्वतःच व्यासपीठावर आले.
लाठय़ा हाणा, मारा, ठोका…
अब्दुल सत्तार यांनी माईकचा ताबा घेत प्रेक्षकांना दमबाजीची भाषा सुरू केली. तरीही प्रेक्षक ऐकत नसल्याचे पाहून सत्तारांचा पारा सरकला. त्यांनी पोलिसांना स्वतःच आदेश द्यायला सुरुवात केली. लाठय़ा हाणा, कुत्र्यासारखे मारा, ठोका, पंबर मोडा, नरडे धरा अशा हिंसक भाषेत पोलिसांना फर्मान सोडायला सुरुवात केली. खुद्द मंत्र्यांनीच फर्मान सोडल्यामुळे पोलिसांनीही ध प्रेक्षकांना झोडपून काढले. हजार पोलीस आहेत, पन्नास हजार लोकांना मारू शकत नाहीत का, अशी चिथावणीखोर भाषाही सत्तार यांनी वापरली.
जनतेच्या घामाच्या पैशातून सत्तारांचा वाढदिवस
घोटाळा शिरोमणी, मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस चक्क जनतेच्या घामाच्या पैशातून साजरा करण्यात येतोय! महोत्सव कृषी विभागाचा, पैसा सांस्कृतिक विभागाचा अन् तमाशा वाढदिवसाचा असा निर्लज्ज प्रकार असून, दहा दिवसांच्या कार्यक्रमावर सरकारी तिजोरीतून तब्बल 50 लाखांची दौलतजादा करण्यात आली आहे.
लाठीचार्जचे आदेश देण्याचा अधिकार कुणाचा?
फौजदारी कायद्यात लाठीचार्ज कोणत्या परिस्थितीत करण्यात यावा याचे स्पष्ट निकष देण्यात आले आहेत. लाठीचार्जचे आदेश देण्याचा अधिकार कुणाला आहे याचीही स्पष्ट व्याख्या दंडसंहितेत करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सिल्लोडचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावरून हिंसक भाषेत पोलिसांना चिथावणीखोर फर्मान सोडण्याबद्दल अब्दुल सत्तार यांच्यावर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पोलीस अधीक्षक म्हणाले, लाठीचार्ज केलाच नाही
अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या चिथावणीखोर भाषेबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, असे विचारले असता ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची बोबडीच वळली. सत्तार जे बोलले त्याला कलवानिया यांनी दुजोरा दिला, पण कार्यक्रमात पोलिसांनी कोणताही लाठीचार्ज केला नाही, असा निखालस खोटा दावाही त्यांनी केला. नेटकऱयांनी सत्तार यांची यथेच्छ बडवणूक केली. त्यानंतर भानावर आलेल्या सत्तार यांनी वृत्तवाहिन्यांवर दिलगिरी व्यक्त केली.
सत्तारांची बतावणी जशीच्या तशी…
ऐ पोलीस वाले, त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना, इतपं मारा की त्यांच्या xxची हड्डी तुटून जाईल. हे पहा हे समोर… हाणा… हाणा… ऐ पोलीस वाले चला पाठीमागे… हाणा त्यांना…ऐ खाली बैस… तुझ्या बापाने कधी पाहय़ला होता का कार्यक्रम… माणसाची औलाद है… माणसासारखा कार्यक्रम घ्या… मला माहितीय… नौटंकी लोक आहेत, शिकवलेले पोपट आहेत… माझे लोक त्यांचे पंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाहीत… त्यांना कुत्र्यासारखे मारा… घ्या लॉकअपमध्ये पाठीमागे…
अब्दुल सत्तार को गुस्सा क्यों आता है
अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस म्हणजे सिल्लोडकरांसाठी खाण्यापिण्याची, मनोरंजनाची जंगी मेजवानीच. दरवर्षी 1 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत सिल्लोडकर याचा आनंद घेत असतात. वाढदिवसाच्या दिवशी सत्तारांना शुभेच्छा देण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहतात. पण या वर्षी सिल्लोडकर रांगेत उभेच राहिले नाहीत. एरव्ही सत्तारांच्या गाडीसमोर उभे राहून सलाम ठोकणारे अधिकारीही फिरकले नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनाचाही सत्तारांच्या वाढदिवसाला फटका बसला. त्यामुळे सत्तारांचा पारा अगोदरच सरकलेला होता. त्यात प्रेक्षकांनी हुल्लड करून भर घातली.
ऐ पोलीस, कुत्र्यासारखे मार, नरडे धर याचे, पंबर मोडा त्याची… ऐकत नाहीत तर जेलात टाका त्यांना, गुन्हे दाखल करा… हजार पोलीस पन्नास हजार लोकांवर लाठय़ा चालवू शकत नाहीत का, हाणा, मारा, ठोका… असे आदेश सत्तारांनी दिले.
हे मंत्री आहेत की गुंड? काँग्रेसचा सवाल
लोकांना कुत्र्यासारखे मारा, त्यांचे कंबरडे मोडा असे आदेश देणारे अब्दुल सत्तार मंत्री आहेत की गुंड आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे. या मुजोर मंत्र्यावर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री दाखवतील काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.