20 दिवसांनंतर देशाची होणार भट्टी, किमान तापमानात होणार वाढ

हवामान बदलामुळे वीस दिवसांनंतर देशाची अक्षरशः भट्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान प्रचंड वाढणार असून उन्हाच्या काहिलीने चटके आणि घामटा अशा कात्रीत नागरिक अडकलेले दिसणार आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून असह्य उकाडा जाणवणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी म्हटले आहे. यंदा जानेवारी महिना इतिहासातील तिसरा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला. या महिन्यात देशातील किमान तापमान  18.04 डिग्री सेल्सिअस इतके असते. यावेळी हेच तापमान 1 डिग्री सेल्सिअसहून अधिक राहिले.

साधारणतः यापूर्वी फेब्रुवारीच्या मध्यापासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत 45 ते 60 दिवस थंडी किंवा उकाडा जाणवत नसे. या कालावधीत वसंत ऋतू असतो, परंतु आता वसंत ऋतूचा काळ वेगाने कमी होत चालला आहे. तर जानेवारी महिन्यात डोंगराळ भागातील बर्फवृष्टीदेखील 80 टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे.

मध्य प्रदेशात कडक उन्हाळा

मध्य प्रदेशात सध्याच्या घडीला कडक उन्हाळा जाणवत आहे. राजस्थानात पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण हवेमुळे दिवसाचे तापमान वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे थंडी कमी होणार असून थंडीची लाट कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु आता उकाडय़ाने नागरिक हैराण होणार असे दिसत आहे.

हिमाचल प्रदेशात उंच भागात पुढच्या 4 दिवसात जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

n पंजाबमध्ये काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अनेक शहरात किमान पारा 20 डीग्री सेल्सियसहून अधिक वाढेल. शनिवारी राज्यात तापमानात 1.6 डिग्री सेल्सियसने वाढ झाली होती.

जानेवारी महिन्यातील आतापर्यंतचे तापमान

वर्ष      किमान  तापमान (डिग्री)              कितीने वाढले

1958  19.21                    1.17

1990  19.01                    0.97

2025  18.98                    0.94

2009  18.94                    0.90

1931  18.90                    0.86