मिंध्यांच्या आमदाराने स्वतःच्या प्रचारासाठी पालिकेच्या उपक्रमाचे 50 हजार कुकर कुर्ल्यात वाटले; निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आमिष

मुंबईतील गोरगरीबांना आधार देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कुर्ल्यात राबवलेल्या ‘कुकर वाटप’ उपक्रमात मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या पैशाने होणाऱ्या या उपक्रमाचे श्रेय मिंधे गटाच्या आमदाराने लाटले असून स्वतःच्या हस्ते 50 हजार पुकर वाटप केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिंधे गटाच्या आमदाराने स्वतःच्या प्रचारासाठी पालिकेच्या उपक्रमाचे श्रेय लाटल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मुंबईतील गोरगरीब-सर्वसामान्यांसाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा देण्यात येतात. यामध्ये शिलाई मशीन वाटप, दिव्यांगांना स्कूटर वाटप, घरघंटी वाटप, विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप आदी उपक्रम घेण्यात येतात. याच धोरणांतर्गत पालिकेच्या खर्चाने गरजूंना कुकर वाटप करण्यात आले. यामध्ये कुकरची किंमत 600 ते 800 रुपयांपर्यंत असताना चार पट जादा दराने हे कुकर खरेदी केल्याचा प्रकारही समोर आला आहे. मिंधे गटाचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते या कुकरचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे पालिकेचा उपक्रम असताना दिलीप लांडे यांनी स्वतःच्या प्रचारासाठी स्वतःच्या नावाने या कुकरचे वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे पुकर चंदनवाडीतील एका खासगी गोडाऊनमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. हे गोडाऊन आमदार मामा लांडे यांचेच असल्याचे समजते. त्यामुळे हा पालिकेच्या प्रॉपर्टीचा गैरवापर असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

पैसा उपक्रम पालिकेचा, होर्डिंग जाहिरात मिंध्यांची
 पालिकेच्या उपक्रमातून प्रेशर कुकर वाटप कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्ष कुकर वाटप मात्र मिंध्यांच्या आमदाराकडून करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी भले मोठे होर्डिंग लावून स्वतःच्याच पैशातून कुकर वाटप केल्याचा बडेजाव यावेळी मिरवण्यात आला.

 दरम्यान, या कुकर खरेदी घोटाळ्य़ाच्या चौकशीसाठी पालिका आयुक्त आणि साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनतेच्या पैशातून गोरगरीब गरजू महिलांना देण्यात येणाऱया कुकर वाटपामध्येही घोटाळा झाल्याने मुंबईकरांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

असा झाला घोटाळा
कुकरची अंदाजित किंमत 600 ते 800 रुपये. पालिकेने खरेदी केले प्रतिपुकर 2498 रुपयांना. एकूण 50 हजार कुकरची खरेदी करून वाटपाचा कार्यक्रम