
मिंधे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात हलगर्जीपणा केला म्हणून घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव कचरे यांची नियुक्ती झाली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पोलीस चौकीतून पळून जाण्यास पोलिसांनी मदत केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
धोडी यांचे 20 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. मात्र पहिल्या सहा दिवसांत तपासाला काही गती नव्हती. अशोक धोडी यांच्या मुलाने आणि पत्नीने घोलवड पोलीस ठाण्यातील अधिकारी, दारूमाफिया आणि अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्याकडून दरमहा मोठ्या रकमेचा हप्ता घेत असल्याचा गंभीर आरोपही केला होता. या आरोपानंतर तब्बल सहा दिवसानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पालघर पोलीस अधीक्षकांनी तपासाला गती दिली. त्यानंतर बाराव्या दिवशी अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील भिलाड येथील बंद पडलेल्या दगडखाणीमध्ये पार्क केलेल्या गाडीच्या डिकीत आढळून आला. या हत्येच्या पाश्र्वभूमीवर घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.