मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली 50 रुपयांची खंडणी, पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याचा भाजीपाला आठवडे बाजारातून पळवला

मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भुरटेगिरी समोर आली आहे. कारेगाव येथील रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडून चक्क 50 रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडणी देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपालाच या पदाधिकाऱ्यांनी उचलून नेला.

सोमनाथ ऊर्फ बंटी नवले या पदाधिकाऱ्यासह 6 ते 7 जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णापूर येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश यशवंत वाळुंज (वय – 37) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. नवले हा मिंधे गटाच्या शिरूर-आंबेगावमधील पदाधिकारी आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगावच्या हद्दीत आठवडे बाजारामध्ये, हॉटेल शेतकरी भोजनालय व टीपी मार्केटमधून जाणाऱ्या शासकीय जागेतील रस्त्याकडेला आठवडे बाजाराच्या दिवशी नीलेश वाळुंज आणि त्यांची आई मंदा वाळुंज हे दोघे कोबी विकण्यासाठी आले होते. तसेच इतर शेतकरी आणि महिलांनी शेतमाल विक्रीसाठी आणला होता.

सायंकाळी सव्वासात वाजण्याच्यादरम्यान सोमनाथ उर्फ बंटी नवले आणि त्याचे 6 ते 7 साथीदार बाजारात आले. त्यापैकी बंटी नवले याने मंदा वाळुंज यांना येथे बसायचे असेल तर तुला 50 रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने त्यांच्या हातातील पन्नास रुपयांची नोट हिसकावून घेतली. या टोळक्याने इतर शेतकरी आणि विक्रेत्यांकडूनही दमदाटी करून जबरदस्तीने 40, 50 ते 100 रुपये काढून घेतले. यामुळे शेतकरी आणि व्यापारी घाबरले आहेत. ज्यांनी पैसे द्यायला नकार दिला, त्यांचा भाजीपाला या भुरट्यांनी उचलून नेला.

ही जागा आम्हाला सरकारने वापरायला दिली आहे, याचे पैसे दिले नाही तर परत तुम्ही कसे या ठिकाणी बसता ते बघतोच अशी धमकी नवले याने शेतकऱ्यांना दिली. तसेच ‘तुम्हाला कोणाला कळवायचे ते कळवा. पोलिसांना आम्ही घाबरत नाही. तुलापण बघून घेईन,’ अशी धमकी नीलेश वाळुंज यांना देऊन जबरदस्तीने पैसे वसूल करून निघून गेले. रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय गायकवाड तपास करीत आहेत.