
>> सामना प्रभाव
डोंबिवलीच्या सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावर जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मधून प्रसिद्ध झाले होते. या वृताची दाखल घेऊन केडीएमसीने गंजलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती केली. गळती रोखल्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सावरकर रस्ता हा डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. डोंबिवली नागरी सहकारी बँकेसमोरील भूमिगत जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी रस्त्यावरून सतत वाहत असते. तर नेहरू रस्त्यावर ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूला भूमिगत जलवाहिनीमधून पाणी गळती असते. या गळतीमुळे स. वा. जोशी शाळा आणि ब्लॉसम शाळेच्या समोरील रस्त्यावर सतत पाणी साचत असते. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिका लक्ष देत नव्हती. दैनिक ‘सामना’तून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिका आयुक्तांनी गळती रोखण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
कायमस्वरूपी तोडगा काढणार
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी दुरुस्ती मोहीम हाती घेऊन गळती रोखली. वारंवार गळती होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्हॉल्व्ह स्थलांतरित करणे तसेच व्हॉल्व्ह चेंबर बनवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.