हक्काची घरे मुंबईतच पाहिजेत! हजारो गिरणी कामगार आझाद मैदानात धडकले

गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने आज हजारो गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार रस्त्यावर उतरले. हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजेत, ही मागणी करत गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात धडकला. सरकारने मुंबईत घरे देण्याचे धोरण त्वरित जाहीर करावे, अन्यथा राज्यातील मंत्र्यांना घेराव घालू, असा इशारा गिरणी कामगारांनी दिला.

मुंबईत घरे मिळाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार करत राज्यभरातील गिरणी कामगार एकजूट दाखवत गुरुवारी सकाळी आझाद मैदानात पोहोचले. गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर, मुंबई गिरणी कामगार युनियनचे (आयटक) कॉ. अरुण निंबाळकर, सर्व श्रमिक संघटनेचे कॉ. उदय भट, कॉ. बी. के. आंब्रे, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी, हेमन धागा जनकल्याण फाऊंडेशनचे हेमंत गोसावी, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, एन. टी. सी. एस. सी/ एस. टी. असोसिएशनचे बबन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो गिरणी कामगार एकवटले. गिरणी कामगारांना मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेणारा 15 मार्च 2024 चा जीआर रद्द करावा आणि गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याचे धोरण जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

n शेलू, वांगणीची घरे कदापि स्वीकारणार नाहीत, असा निर्धार गिरणी कामगारांनी केला.

n टाटा मिल, पोतदार, इंडिया युनायटेड नंबर 5 येथील गिरणी कामगारांना चार महिने पगार दिलेला नाही, तो त्वरित द्यावा, अशी मागणी गिरणी कामगारांनी केली.

 गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधा

15 मार्च 2024 रोजीचा जीआर दिशाभूल करणार आहे. कारण आजही मुंबईत एनटीसीच्या मालकीची 121 एकर जागा आहे, जी सरकारने ताब्यात घेतलेली नाही. तसेच खासगी गिरण्यांची जागाही ताब्यात घेतलेली नाही. सरकारने आजपर्यंत 18 गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या असून अजूनही 40 गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेणे बाकी आहे. ही सर्व जमीन ताब्यात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यावर गिरणी कामगारांसाठी त्वरित घरे बांधावीत, अशी  गिरणी कामगारांची प्रमुख मागणी असल्याचे बाळ खवणेकर, कॉ. अरुण निंबाळकर यांनी सांगितले.

शिवसेना पाठीशी

शिवसेना आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे आणि महेश सावंत यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱया गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांची भेट घेतली. शिवसेना सदैव गिरणी कामगारांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी आश्वस्त केले.