शिवसेनेची मध्यस्थी यशस्वी; गिरणी कामगारांचे उपोषण अखेर मागे

गिरणी कामगारांचे मुंबईतच मोफत पुनर्वसन करावे तसेच उर्वरित सर्व गिरणी कामगार आणि वारसांना घरासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एक संधी द्यावी आदी मागण्यांसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी येथे गिरणी कामगार व वारसांनी संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून अखंड धरणे आंदोलन केले होते.

संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे समन्वयक समिती सदस्य रमाकांत बने व गिरणी कामगार नेते हेमंत गोसावी हे गेल्या चौदा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. अखेर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यस्थीमुळे गिरणी कामगारांनी उपोषण मागे घेतले आहे.

शिवसेना नेते, विभागप्रमुख आमदार अ‍ॅड. अनिल परब आणि शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी बुधवारी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची भेट घेतली. आंदोलनाच्या पाठीशी कसे उभे राहायचे आणि आंदोलन कसे यशस्वी करायचे हे आम्हाला ठाऊक आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचे जीव आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तूर्तास उपोषण मागे घ्या.

भविष्यात या प्रश्नावर मोठे आंदोलन करू. शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे अ‍ॅड. अनिल परब यावेळी म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या गिरणी कामगारांनी मोलाचे योगदान दिले. त्या गिरणी कामगारांच्या आंदोलनाची साधी दखलसुद्धा राज्य सरकार घेत नसेल तर त्यांचा निषेध करावा तितका कमीच आहे, असे आमदार सचिन अहिर यावेळी म्हणाले.