वांगणीतील गृह प्रकल्प रद्द करा, गिरणी कामगार संघटनांची मागणी

गिरणी कामगारांसाठी शेलू येथे 30 हजार तर वांगणीत 51 हजार घरे बांधण्यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटे देण्यात आली आहेत. पण काही गिरणी कामगार संघटनांनी वांगणीचा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी उचलून धरली आहे.

गिरणी कामगारांसाठी शेलू येथे कर्मयोगी एव्हीपी रियल्टीकडून 30 हजार घरांची तर चढ्ढा डेव्हलपर्सकडून वांगणी येथे 51 हजार घरांचे बांधकाम केले जाणार आहे. कामगार संघटनांनी वांगणीची जागा व प्रकल्प नापसंत केला. असे असतानाही वांगणीचा प्रकल्प का रेटला जातोय, असा सवाल महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच, गिरणी कामगार संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला लेखी कळविले आहे.

शेलूतील घरांच्या किमती कमी करा

शेलूतील प्रकल्पास गिरणी कामगारांनी पसंती दर्शविली आहे. पण येथील घरांच्या किमती मात्र कामगारांना मान्य नाहीत. या घरांसाठी साडेनऊ लाख रुपये भरावे लागणार आहेत. मुंबईबाहेर ही घरे असताना इतकी रक्कम का, असे म्हणत घरांच्या किमती कमी करण्यासंबंधी नुकतेच संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.