मुंबई क्रिकेटने सच्चा क्रिकेटसेवक गमावला

गेली पाच दशके मुंबई क्रिकेटची सर्वतोपरी सेवा करणाऱ्या मिलिंद रेगे यांच्या निधनाने मुंबई क्रिकेटने सच्चा क्रिकेटसेवक गमावल्याची भावना प्रत्येक क्रिकेटपटू, क्रिकेट संघटक आणि क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर उमटली होती.

बुधवारी सकाळी आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रेगे यांच्या क्रिकेटसेवेला पूर्णविराम मिळाला होता. आज त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याप्रसंगी शिशिर हट्टंगडी, चंद्रकांत पंडित, राजू कुलकर्णी, संजय मांजरेकर, नीलेश कुलकर्णीसमवेत अनेक मुंबई क्रिकेटचे धुरंधर क्रिकेटसेवकाला अखेरची मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. तसेच मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनीही त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले.

मिलिंदमध्ये हिंदुस्थानी संघात खेळण्याची क्षमता होती – गावसकर

मिलिंद माझा बालपणीचा मित्र. आम्ही शाळेत-कॉलेजमध्ये एकत्र खेळलो. माझ्या आधी त्यानेच रणजी पदार्पण केले. मात्र त्याची कारकीर्द रणजी क्रिकेटच्या पुढे गेली नाही. त्याला अनेक कारणे आहेत. तेव्हा प्रसन्ना, वेंकटराघवन यांच्यासारखे दिग्गज हिंदुस्थानी संघात होते. त्यामुळे मिलिंद संधीच्या शोधातच राहिला. पुढे वयाच्या 26 व्या वर्षीच आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याची कारकीर्दही हादरवली, पण तो हादरला नाही. तो लढला आणि पुन्हा मुंबईसाठी खेळला. कर्णधारही झाला. त्याची कारकीर्द फार बहरली नाही. तरीही त्याच्या ध्यानीमनी फक्त आणि फक्त क्रिकेटच होते. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन, सीसीआय असो किंवा टाटा स्पोर्ट्स क्लब. त्याने आपले क्रिकेटवरचे प्रेम यांच्या माध्यमातून गेली चार दशके सांभाळले. खरे सांगायचे तर त्याने आपले अवघे आयुष्य क्रिकेटसाठी झोकून दिले. काही बाबतीत तो आपल्या मतांवर ठाम असल्यामुळे अनेकांनी ते खटकले. काही त्याच्या विरोधातही गेले, पण त्याच्यावर काडीचाही फरक पडला नाही. कारण तो क्रिकेटचा चाहता होता, सेवक होता. त्याच्या सेवेबद्दल कुणाच्या मनात तीळमात्र शंका येऊच शकत नाही, अशी भावना सुनील गावसकर यांनी आपल्या मोठय़ा भावाविषयी व्यक्त केली.

मिलिंद रेगे यांची कारकीर्द

  • 1966-67 च्या मोसमात फिरकीवीर म्हणून रणजी पदार्पण.
  • दहा वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत 52 सामने खेळले. 23.56 च्या सरासरीने 1532 धावा तर 126 विकेट टिपल्या.
  • तब्बल तीन दशके मुंबई क्रिकेटमध्ये निवड समिती तसेच क्रिकेट सुधारणा समितीसह अनेक उपसमित्यांवर सक्रिय.
  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हिडीओ ऍनालिस्टची कल्पना आणली.
  • 2020 सालापासून मुंबई क्रिकेट संघटनेच्या सल्लागारपदी, तसेच मुंबई क्रिकेट संघाचे मार्गदर्शक.
  • टाटा स्पोर्ट्स क्लबच्या सचिवपदी असल्यामुळे अनेक क्रिकेटपटूंना टाटा स्टीलमध्ये सेवेत घेतले.

मिलिंद रेगे यांची आज वानखेडे स्टेडियमवर शोकसभा

मुंबई क्रिकेटच श्वास आणि ध्यास असलेल्या मिलिंद रेगे यांच्या क्रिकेटसेवेला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने शुक्रवार, 21 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियमवर शोकसभेचे आयोजन केले आहे. या सभेला मुंबई क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांसह रेगे यांचा मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली.

मुंबईचे अष्टपैलू रणजीपटू असलेल्या मिलिंद रेगे यांना वयाच्या 26 व्या वर्षीच हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांची क्रिकेट कारकीर्दच कोलमडली. त्यांनी या धक्क्यातूनही स्वतःला सावरत मुंबई संघात पुनरागमन केले होते, मात्र त्यांची कारकीर्द फारशी बहरली नाही. त्यानंतर त्यांनी आपली क्रिकेटची सेवा मुंबई क्रिकेट संघटना, टाटा स्पोर्ट्स क्लब आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणखी प्रभावी केली होती. क्रिकेटमधल्या हिर्यांना शोधण्यात ते माहीर असल्यामुळे त्यांनी अनेक क्रिकेटपटू मुंबई क्रिकेटला दिले, जे पुढे देशासाठी खेळले. अशा क्रिकेटसेवकाच्या निधनामुळे मुंबई क्रिकेट पोरके झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या क्रिकेटप्रेमाच्या आणि शिस्तीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने मुंबईच्या सर्व दिग्गज क्रिकेटपटूंना, माजी रणजीपटूंना, तसेच क्लब सचिवांना आमंत्रित केले आहे.

रेगे हे एक क्रिकेटपटू म्हणून उपयुक्त होतेच, पण त्यांनी आपल्या कारकीर्दीत निवडकर्ते, प्रशासक म्हणूनही चोख कामगिरी बजावली होती. वयाच्या सत्तरीनंतर निवृत्त होण्याऐवजी मुंबई क्रिकेटची सेवा करण्याची इच्छा कायम असल्यामुळे त्यांना मार्गदर्शक म्हणून मान देण्यात आला होता.