‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना‘तील बंद पडलेल्या रक्तचाचण्या तातडीने सुरू करा! – मिलिंद नार्वेकर

मुंबईतील गोरगरीबांना परवडणाऱया दरात औषधोपचार मिळावेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधील रक्तचाचण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या कराव्या लागत असून नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बंद पडलेल्या रक्तचाचण्या तातडीने सुरू करा, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज विधान परिषदेत केली.

मुंबईत 17 नोव्हेंबरपासून ‘आपला दवाखाना’ची सुरुवात करण्यात आली आहे. या दवाखान्यात दंत चिकित्सा, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ अशा विविध तज्ञांच्या सहाय्याने उपचार सुरू असतात. तसेच महानगरपालिकेने माफक दरात एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटीस्पॅन, एमआरआय इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दवाखान्यात मुंबई महानगरपालिकेकडून खासगी आणि नामांकित प्रयोगशाळांशी करार करून विविध प्रकारच्या 147 रक्तचाचण्या करण्यात येत होत्या. परंतु सद्यस्थितीत या दवाखान्यांतील बहुतांश रक्तचाचण्या बंद झाल्या आहेत, असे आमदार नार्वेकर यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

वरळी हिट अॅण्ड रन खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवा

वरळी येथे एका श्रीमंत बापाच्या मुलाने बीएमडब्ल्यू कार वेगाने चालवून दुचाकीला धडक दिल्याने एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. दुचाकीला धडक दिल्यानंतर आरोपीला महिला आपल्या कारच्या एका टायरमध्ये अडकल्याची जाणीव होऊनही त्याने बेपर्वाईने गाडी पुढे चालविली. संबंधित कारचालकाने मद्यप्राशन केले असल्याचे या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. परंतु संबंधित आरोपीच्या फॉरेन्सिक अहवालात त्याने मद्यपान करून गाडी चालवल्याचा दावा आश्चर्यकारक रीतीने फेटाळून लावण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी ‘फास्ट ट्रक’’ कोर्टासमक्ष सुरू करण्यात यावी, अशीही मागणी आमदार नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली.