
गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इका@नॉमिक्समधून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांकडे कानाडोळा करीत सुमारे एक कोटी 42 लाखांचा निधी नियमबाह्य वळवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोखले इन्स्टिटय़ूट ही संस्था सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या अधीन असून, शासकीय अनुदान, यूजीसी अनुदान आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावर कार्यरत आहे. यूजीसीच्या ‘एमओए’नुसार संस्थेच्या खात्यातील निधी इतर खात्यात वळवणे नियमबाह्य आहे. मात्र, देशमुख यांनी 13 डिसेंबर 2022 रोजी गोखले इन्स्टिटय़ूटला पत्र देत नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली. ही मागणी कोणत्याही अधिपृत ठरावाविना करण्यात आली होती. त्यानंतर गोखले इन्स्टिटय़ूटच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटने 14 डिसेंबर 2022 मध्ये या मागणीला तत्त्वतः मान्यता दिली. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱयांनी संस्थेची फसवणूक करत स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार डॉ. विशाल गायकवाड यांनी केला आहे.