कावेरी नाखवा यांचा अत्यंत निर्दयीपणे बळी घेणारा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीरने दारूची ‘झिंग’ उतरताच स्वत: केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्याने आधी जुहूच्या पबमध्ये मित्रांसोबत दारू ढोसली. नंतर बोरिवलीहून मरीन ड्राइव्हच्या दिशेने जाताना मालाडच्या बारमधून पुन्हा बियरचे चार टिन खरेदी केले. ते चारही कॅन कारमध्येच रिचवले. त्याच धुंदीत गिरगाव चौपाटीजवळ कार चालवायला घेतली. पुढे बेदरकार ड्रायव्हिंग करीत कावेरी यांचा हकनाक जीव घेतला. बंपर व चाकामध्ये अडकलेल्या कावेरी यांना सी लिंकच्या लॅण्डींग पॉईंटपर्यंत फरफटत नेले. पोलीस तपासात मिहीरनेच हे सर्व मान्य केल्याने आतातरी पोलीस त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.
वरळीतील घटनेच्या काही तास आधी मिहिरने जुहूतील विस ग्लोबल तपस पबमध्ये तिघा मित्रांसोबत पार्टी केली. तेथे तो जॅक डॅनियल व्हिस्कीचे चार लार्ज पेग प्यायला होता. पबमधील ही पार्टी आटोपल्यानंतर मित्रांना घरी सोडून तो बोरिवलीत घरी गेला. तेथे गाडी बदलली आणि बीएमडब्ल्यू कारने पुन्हा फिरण्यासाठी निघाला. मालाड येथे पोहचल्यावर त्याने साईप्रसाद बारमधून बडवायझर मॅग्नम बियरचे 500 मिलीचे चार टिन घेतले. तेथून मरिन ड्राईव्हला येईपर्यंत त्याने बियरचे चारही टिन रिचवले. गिरगाव चौपाटीजवळ पोहचल्यानंतर त्याने राजऋषी बिडावतकडून गाडी चालवायला घेतली. नशेमध्येच तो कार चालवू लागला. अखेर वरळीच्या सीजे हाऊसजवळ नशेतच नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतरही त्याची नशा उतरली नाही. तो क्रूरपणे वागला. बंपर आणि चाकात अडकलेल्या कावेरी नाखवा यांना वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या लॅण्डींग पॉईंटपर्यंत फरफटत नेले. पोलिसांच्या तपासात या सर्व धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
घटनेनंतर 60 तास मोकाट राहिलेल्या मिहीरच्या रक्तात दारूचा अंश सापडेल की नाही? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण मिहिरने नशा करूनच गाडी चालविल्याचे सबळ पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मिहिरने मित्रांसोबत ज्या पबमध्ये दारू प्यायली, तेथील सीसीटीव्ही फुटेज, मॅनेजर, कर्मचारी व मित्रांचा जबाब, पार्टीचे बिल यावरून मिहिरने दारू प्यायल्याचे स्पष्ट होते. मालाड येथील साईप्रसाद बारमधून त्याने ज्या वेटरकडून दारू घेतली होती, त्या वेटरचाही जबाब नोंदवला आहे.
बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील कावेरी कारच्या बोनेटवर पडल्या. कार वेगात असल्याने कावेरी बोनेटवरून पुढे सरकल्या आणि बंपर व चाकामध्ये अडकल्या. त्यांना अशाप्रकारे अडकल्याचे पाहूनही मिहीरने त्यांना सी लिंकपर्यंत फरपटत नेले. वरळीतीळ बिंदुमाधव ठाकरे चौक पार केल्यानंतर बाजूने जाणाऱया अन्य कार चालकांनी बीएमडब्ल्यूला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण मिहीरने त्यांचे ऐकले नाही.
बिडावतला न्यायालयीन कोठडी
राजऋषी बिडावतला शिवडी न्यायालयाने गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मिहीरने बिडावतला बिअरचा एक टिन पिण्याचा आग्रह केला होता. पण बिडावतने त्याला नकार दिला. तसेच गिरगाव चौपाटीजवळ मिहिरने गाडी चालविण्याची इच्छा व्यक्ती केली, त्यावेळी बिडावतने मिहीरला नको म्हटले होते. त्यानंतरही मिहिरने कार चालवल्याचे उघड झाले आहे.
– मिहिरने त्याचा मित्र ध्रुव देडियाच्या ओळखीने जुहूच्या पबमध्ये एंट्री मिळवली होती आणि मिहिर तेथे हार्ड ड्रिंक पिऊ शकला होता.त्यासाठी आवश्यक परवाना घेतलेला नव्हता. पोलिसांना अजून कारची नंबर प्लेट मिळालेली नाही. तसेच मिहिरने बियरचे टिन रिचवून ते कुठे फेकले, याचा तपास बाकी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला
मिहीरला पकडल्यानंतर वरळी पोलिसांनी आधी वेगवेगळ्या ठिकाणी व नंतर समोरासमोर बसवून मिहिर आणि राजऋषी बिडावत या दोघांची सखोल चौकशी केली. याचवेळी मिहीरने गुन्हा केल्याची कबुली दिली. गिरगाव चौपाटी ते सी लिंकच्या लॅडिंग पाँईटपर्यंत स्वत: कार चालविल्याचे त्याने मान्य केले. अधिक पुराव्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या उपस्थितीत वरळीच्या सीजे हाऊसपासून ते सी लिंकपर्यंत गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला.