मिहीर शहा ‘राक्षस’! या खुन्याला कोळीवाडय़ात भरचौकात सोडा!! आदित्य ठाकरे यांचा संताप

वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर कावेरी कारच्या बंपर आणि चाकामध्ये अडकल्या असताना त्यांना निर्दयीपणे दोन किलोमीटर फरफटत नेले. जखमी नाखवा दाम्पत्याकडून गाडी थांबवण्याची विनवणी करूनही त्याने गाडी थांबवली नाही. कहर म्हणजे चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढून गाडीने त्यांना चिरडून पळ काढला. नरकातून आलेला राक्षससुद्धा असे भयंकर कृत्य करणार नाही, असा संताप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. साधा गुन्हेगार असला तर त्याला जेलमध्ये टाकून शिक्षा तरी होईल. मात्र मिहीर शहा खुनी राक्षस आहे. त्याला ‘फास्ट ट्रक’वर शिक्षा करा. मी तर म्हणेन मिहीर शहाला कोळीवाडय़ातील भरचौकात सोडा, अशी मागणीही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी आज नाखवा पुटुंबीयांच्या वरळी येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. कोणत्याही परिस्थितीत नाखवा कुटुंबाला न्याय मिळवून देणार, असा विश्वास देत आपण तुमच्या पाठीशी ठाम असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार अस्लम शेख, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आदी उपस्थित होते. वरळीतील घटना मन हेलावून टाकणारी असल्याचे ते या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. नरकातून राक्षस जरी आला तरी असे कृत्य करणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला ‘फास्ट ट्रक’मध्ये तातडीने शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. राक्षस मिहीर जरी थांबला असता तरी ही दुर्घटना टळली असती. मात्र त्याने असे केले नाही. त्याच्या राक्षसी वृत्तीमुळे एक नाहक बळी गेला, याचा संताप आणि आपलं माणूस गमावल्याचे दुःख नाखवा कुटुंबीयांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अशा राक्षसाला कोळीवाडय़ाच्या भरचौकात सोडा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

राजेश शहाच्या घरावर बुलडोझर चालवणार का?

मिहीर राजेश शहा हा राक्षसच आहे. सीसीटीव्ही पूर्ण आहे, इंटेलिजन्स आहे, मग आरोपीला अटक करण्यास 60 तास का लागले, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. पुढची कारवाई कशी असणार, असा सवाल करीत बारवर कारवाई करणारे प्रशासन राजेश शहाच्या घरावर बुलडोझर चालवणार आहे का, असा सवालही त्यांनी व्यक्त केला. इतका भयानक प्रकार मुंबई-महाराष्ट्रात होऊच कसा शकतो, असे ते म्हणाले. त्यामुळे असा भयंकर अपराध करणाऱ्या राक्षसाला देशातील सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

दादा, त्याला नाही सोडायचं!

‘दादा, त्याला सोडायचं नाही’, अशी आर्त साद कावेरी यांच्या मुलीने आदित्य ठाकरे यांना घातली. यावेळी आपण आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. कावेरी यांचे पती प्रदीप यांनाही दुःख अनावर झाले. ‘माझ्या डोळ्यासमोर त्याने माझ्या पत्नीला फरफटत नेले, असे सांगत त्यांनी हंबरडा फोडला. तर कावेरी यांच्या आई म्हणाल्या की, माझ्या मुलीसोबत ज्यांनी जसे केले, त्यांच्यासोबत तेच केले पाहिजे, म्हणजे त्यांना आमचे दुःख कळेल!