80 प्रवाशांना घेऊन स्पेनला जाणारी बोट उलटली; पाकिस्तानमधील 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

मॉरिटानियाहून सागरी मार्गाने स्पेनला जात असताना 80 प्रवासी असलेली बोट मोरक्कन बंदराजवळ उलटल्याने 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. एकूण 50 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे वॉकिंग बॉर्डर्स या स्थलांतरितांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेल्या गटाने सांगितले. “बुडून मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 44 जण पाकिस्तानचे आहेत. ते 13 दिवस अडकून राहिले होते. पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही,” असे वॉकिंग बॉर्डर्सच्या सीईओ हेलेना मालेनो यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून म्हटले आहे.

मोरोक्कोमधील दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने निवेदनाद्वारे म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांसह वाचलेल्यांना येथील जवळील एका छावणीत ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मोरक्कनच्या अधिकाऱ्यांनी 2 जानेवारी रोजी 66 पाकिस्तानींचा समावेश असलेल्या मॉरिटानियाहून निघालेल्या बोटीतून 36 जणांची सुटका केली होती. या बोटीत एकूण 86 जण होते.

मानवी तस्करीविरोधात कारवाई करणार

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सरकारी यंत्रणांना बाधित पाकिस्तानी नागरिकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेचा अहवाल मागितला असून मानवी तस्करीच्या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.